धुळे | धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत येणारे सुमारे 21 कोटींचे मुद्रांक शुल्क निधी शासनाने अदा केला नाही. त्यामुळे विकास रखडला आहे. शासनाने हा निधी देण्याची मागणी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी अधिवेशनात केली आहे. या बरोबरच धुळ्यात गृह खात्याच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून या संदर्भात देखील ठोस पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात धुळे जिल्ह्यातील प्रश्न आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत मांडले आहेत. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या तिजोरीत येणारे सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क रखडले असल्याचा प्रश्न प्रकर्षाने मांडला. या मुद्रांक शुल्कची रक्कम महानगरपालिकेस मिळाल्यास महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाची कामे करण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाने तातडीने या संदर्भात मुद्रांक शुल्क रक्कम अदा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून, लहान मुले आणि महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एका प्राण्यावर १६०० रुपये खर्च होणाऱ्या ऍनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. यावर उपाय म्हणून नगर विकास खात्यामार्फत आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. धुळे शहरातील गृह खात्याच्या जमिनींवर अतिक्रमण वाढले असून हे अतिक्रमण धोकादायक ठरत आहे. या विषयाकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेत झाली.