धुळे

Dhule News : धुळ्यात कचरा ठेकेदाराकडून महापालिकेची आर्थिक फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शहरातील कचरा संकलनाचे वजन वाढवण्यासाठी ट्रॅक्टर आणि वाहनांमध्ये कचऱ्याऐवजी माती व दगड-धोंडे भरून धुळे महानगरपालिकेची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित भाग्यदीप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आणि संगनमत करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेने धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, संदीप सूर्यवंशी आणि प्रशांत ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वार्षिक १८ कोटींचा ठेका आणि निम्मीच वाहने

धुळे महानगरपालिकेने पुणे येथील 'भाग्यदीप्स वेस्ट मॅनेजमेंट' या कंपनीला वार्षिक १८ कोटी रुपये दराने शहरातील ओला व सुका कचरा उचलून डेपोवर टाकण्याचा ठेका दिला आहे. नियमानुसार ठेकेदाराला १०० घंटागाड्या, ३६ ट्रॅक्टर, १ पोकलँड आणि डंपर अशी वाहने वापरणे बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदार यापैकी निम्म्याच वाहनांद्वारे कचरा संकलन करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

कचऱ्याच्या वजनात 'असा' होतोय कोट्यवधींचा झोल

शिवसेनेने दिलेल्या तक्रारीत भ्रष्टाचाराची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे:

जास्तीचे वजन: शहरात दररोज २०८ टन कचरा संकलनाचा ठेका असताना, ठेकेदार आणि मनपाचे काही अधिकारी संगनमताने रोज २६० ते २७० टन वजन दाखवत आहेत.

ओल्या-सुक्या कचऱ्याचा खेळ: सुक्या कचऱ्याचा दर जास्त आणि ओल्या कचऱ्याचा दर कमी आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ओला कचरा केवळ २५ ते ३० टन दाखवला जातो (जो वास्तवत: १०० टनांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे), तर सुका कचरा तब्बल २३० ते २४० टन दाखवला जात आहे.

बिलांसाठी मातीची भरती: सुक्या कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात सर्रास माती आणि बांधकामाचे मटेरियल भरून दिवसाढवळ्या महापालिकेची लूट सुरू आहे.

व्हिडिओ पुरावे आले समोर

कचरा ठेकेदाराच्या या मनमानीचे आणि भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे समोर आले आहेत:

१. १७ एप्रिल २०२६ रोजी मनपा नगरसेवक धीरज परदेशी यांनी कचरा ठेकेदाराचे कर्मचारी ट्रॅक्टरमध्ये माती भरत असतानाचा आणि त्यांना जाब विचारतानाचा व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध केला होता.

२. स्थायी समितीच्या सभेत कृपेश नांद्रे यांनीही यावर आवाज उठवला होता.

३. शिवसेना पदाधिकारी संदीप सूर्यवंशी यांनी शिवतीर्थाच्या मागे कर्मचाऱ्यांना माती भरताना रंगेहाथ पकडले. "ठेकेदारानेच वजन वाढवण्यासाठी माती भरायला सांगितली आहे," अशी कबुली देणारा कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

४. आज (बुधवार) पुन्हा गरुड कॉम्प्लेक्स परिसरात ट्रॅक्टरमध्ये दगड-माती भरताना शिवसैनिकांनी कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे.

जनतेच्या पैशांवर डल्ला!

गेल्या २ महिन्यांत ठेकेदार तब्बल ४ ते ५ वेळा माती भरताना रंगेहाथ पकडला गेला आहे. यापूर्वी महापालिकेने दंडात्मक कारवाई देखील केली आहे. ठेकेदाराला दरमहा सुमारे ४.९५ लाख रुपयांचे बिल अदा केले जाणार आहे, मात्र तरीही शहरातील कचरा कमी झालेला नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा जनतेच्या कराच्या पैशांवर मारलेला डल्ला असून, यातील दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT