धुळे : दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला आहे. या अधिवेशनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या हिताचे विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. विशेषता जिल्ह्यात आयुष रुग्णालय स्थापन करावे, त्याचप्रमाणे रेल्वे, रस्त्यांचे आणि सिंचनाच्या प्रकल्प संदर्भात देखील संबंधित विभागाकडे मागणी करण्यात आली
धुळे जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यास गती मिळाली आहे. संबंधित मंत्री यांच्याकडेही मतदारसंघ विकासाचे विविध प्रश्न मांडले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकासात भर टाकणारे विविध महत्वकांक्षी प्रकल्प, अनेक विषयांकडे डॉ. शोभा बच्छाव यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये आयुष रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात धुळे लोकसभा मतदारसंघातही आयुष रुग्णालय निर्माण करण्यात यावे यासाठी केंद्र शासनाने भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.
अधिवेशनातही या प्रश्नांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. धुळे जिल्हा औद्योगिक दृष्ट्या विकसित व्हावा, राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या मोठ्या शहरांशी औद्योगिक कनेक्टिव्हिटी धुळे लोकसभा मतदारसंघाची वाढावी ,तसेच धुळे जिल्हावासियांची प्रवासाची सुलभ सोय व्हावी. म्हणून धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा तात्काळ सुरू व्हावी, यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे डॉ. बच्छाव यांनी केली आहे. रेल्वेमंत्री यांनी ही रेल्वे विभागाला याप्रकरणी तत्काळ अभ्यास करून उचित कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत धुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांना मान्यता द्यावी, जेणेकरून धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित असलेले रस्ते, पुलांची कामे ही वेगवानपणे होतील यासाठी डॉ.शोभा बच्छाव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणी त्यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला आहे.
दरम्यान मणिपूर हिंसाचार ,अत्याचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, यासाठी काँग्रेसने केलेल्या आंदोलनात सक्रियपणे सहभाग नोंदविला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयक केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अवमान जनक वक्तव्य केल्याने सरकार विरुद्ध काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात डॉ. बच्छाव यांनी सक्रियपणे सहभाग नोंदविला.