धुळे : धुळे शहरालगतच्या अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो कामगार, व्यापारी आणि उद्योजकांची वर्दळ असते. परंतु, मोठ्या प्रमाणावरील वाहतूक, सततची कोंडी आणि वाढते अपघात पाहता, औद्योगिक वसाहतीपासून रावेर रस्त्यापर्यंत तातडीने नवीन पूल बांधण्याची मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावरून केली.
अग्रवाल यांनी सभागृहात लक्ष वेधताना सांगितले की, अवधान एमआयडीसीकडे जाण्यासाठी सध्या केवळ राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय उपलब्ध आहे. या महामार्गावर सातत्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय वाहतूक कोंडीमुळे स्थानिक उद्योगांवरही नकारात्मक परिणाम होत आहे.
अग्रवाल पुढे म्हणाले की, अवधान औद्योगिक वसाहतीपासून रावेर रस्त्यापर्यंत नवीन पूल झाल्यास केवळ वाहतूक सुरळीत होईल असे नव्हे, तर कामगार, व्यापारी आणि उद्योजकांना सुरक्षित व सुलभ मार्ग मिळेल. यामुळे औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या मालवाहतूक वाहनांनाही पर्यायी मार्ग उपलब्ध होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, व्यापारी आणि उद्योग मित्र समितीनेही या पुलासाठी शासन आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे आता या मागणीला शासनाने गांभीर्याने घेऊन पुलाच्या कामासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी अधिवेशनात केली.