धुळे : धुळ्यात ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आक्रमक झाले असून सोमवार, दि. 9 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेसाठी नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली असून यावेळी ईव्हीएम मशीनची होळी केली जाणार आहे.
धुळे येथील चाळीसगाव रोड चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथून निघणाऱ्या "मशाल मोर्चा" मध्ये शेकडो माता-भगिनी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होतील. हा मोर्चा आग्रारोडने सोमवार (दि.9) संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र होईल. त्या ठिकाणी मोर्चाला मार्गदर्शन करण्याकरीता शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महिला आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लेखी निमंत्रण पाठविण्यात आले असल्याची माहीती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धिरज पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, विजय वाघ यांनी तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, युवराज करनकाळ यांनी दिली आहे.
महात्मा गांधी पुतळ्यासमोर होणाऱ्या जाहीर सभेत निमंत्रित नेत्यांची मार्गदर्शपर भाषणे होतील, तसेच त्याच ठिकाणी ईव्हीएम मशिनची जाहीर होळी केली जाईल. तेथेच भविष्यातील पुढील वाटचाल जाहीर केली जाणारआहे. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या राज्यव्यापी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडी नेत्यांकडून करण्यात आले आहे.