आमदार कुणाल पाटील यांना सन 2023-24 करीता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार घोषीत झाला आहे. file photo
धुळे

धुळे : आ.कुणाल पाटील यांना महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार; मंगळवारी सन्मान

पुढारी वृत्तसेवा

धुळे : विधान मंडळात जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने विधीमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्या अनुषंगाने धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना सन 2023-24 करीता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार घोषीत झाला आहे. आ.पाटील यांना मंगळवारी (दि.3) रोजी विधान भवनात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अभ्यासपूर्ण भाषणातून जनतेचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडल्यामुळे आ.कुणाल पाटील यांना महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात येत आहे.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. त्यात सन 2023-24 करीता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषणाचा महत्वाचा पुरस्कार धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांना घोषीत झाला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढणारे,विधायक आणि लोकहितासाठी विधानभवनात अभ्यासपूर्ण भाषणातून प्रभावीपणे लढणार्‍या विधीमंडळ सदस्यांना हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आ.कुणाल पाटील यांचा महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. मंगळवार (दि.3) रोजी दु.3.30 वा. मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ तसेच महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहातील आमदार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

या प्रश्नांवर विधीमंडळात मांडले महत्वपूर्ण मुद्दे

  • धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रश्‍नांसोबतच आ.कुणाल पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्‍नांवर विधीमंडळात आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून वाचा फोडली आहे. धुळे-नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील कुपोषणावर आवाज उठवित त्यांनी हा प्रश्न मांडला होता. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणार निष्कृष्ठ दर्जाचा शालेय पोषण आहाराचा प्रश्‍न विधानसभेच्या अधिवेशनात मांडून महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

  • विधीमंडळाचा शासकीय आयुधांचा वापर करीत अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, तसेच शासकीय कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मांडून ते सोडविण्याचे काम त्यांनी विधीमंडळाच्या माध्यमातून केले आहे.

  • शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसोबत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आ. कुणाल पाटील यांनी आवाज उठविला आहे.

  • अतिवृष्टी, दुष्काळ, विजेचे प्रश्‍न, वाढत्या शेतकरी आत्महत्या, शेतकर्‍यांवर आलेले नैसर्गिक संकट, शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी अशाप्रकारे शेतकर्‍यांशी निगडीत असलेले विविध प्रश्‍न त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून प्रभावीपणे मांडले.

  • शेतकर्‍यांचे प्रश्‍न विधीमंडळाच्या पटलावर मांडल्याने शेतकर्‍यांना न्याय मिळण्यास खरी मदत झाली. शेतकरी,सर्वसामान्य जनता आणि शासकीय कर्मचार्‍यांचे प्रश्‍नांसोबतच आ.कुणाल पाटील यांनी विकासाला चालना मिळावी म्हणून विविध मागण्याही त्यांनी भाषणातून प्रभावीपणे मांडल्या.

कृषी, सिंचन,आरोग्य, शिक्षण असे महत्वपूर्ण विषय प्रभावीपणे मांडून विकासाचे प्रश्‍न सोडवून घेतले. अभ्यासपूर्ण भाषणातून जनतेचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडल्यामुळे आ.कुणाल पाटील यांना महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात येत आहे.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आ.कुणाल पाटील हे दुसर्‍यांदा निवडून आले असून ते महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे चेअरमन आहेत. जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यामाध्यमातून यशस्वीपणे सिंचन चळवळ राबविल्याबद्दल आ.कुणाल पाटील यांना भारतीय जलसंस्कृती मंडळाच्यावतीने जलगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आ.कुणाल पाटील यांनी डिसेंबर-2021 आणि मार्च 2022मध्ये महाराष्ट्र विधानसभेतील अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामकाज सांभाळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT