धुळे : धुळ्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण १८ हजार ५९४ प्रकरणांचा निपटारा तसेच २६ कोटी १ लाख ७६ हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करुन देण्यात आल्याची माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, प्रविण एन. कुलकर्णी यांनी दिली आहे.
हि लोक अदालत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. धुळे जिल्हयातील सर्व न्यायालयात "राष्ट्रीय लोकअदालतचे" आयोजन करण्यात आले होते. सदर लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित ६ हजार ३८१ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे दाखलपुर्व ७९ हजार ५२४ प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिका, ग्रामपंचायत, विज थकबाकी प्रकरणे, बॅकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती.
सदर प्रकरणांपैकी ४५४ प्रलंबित प्रकरणे व १८ हजार १४० दाखलपुर्व प्रकरणे असे एकुण १८ हजार ५९४ समोपचाराने निकाली निघाली. या लोकअदालतमध्ये एकुण २६ कोटी १ लाख ७६ हजार रूपयांची वसुली व नुकसान भरपाई झाली. मोटार अपघात प्रकरणापैकी १६० प्रकरणे तडजोडीने निकाली होवुन रक्कम रू.१३ कोटी २६ लाख २५ हजार रूपये पक्षकारांना वसुल करून देण्यात आले.
या लोकअदालतसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, पोलीस, सर्व बँका, महानगरपालिका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी, सर्व न्यायालयीन कर्मचारी, विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी इत्यादींनी अमुल्य सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, प्रविण एन. कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.