धुळे; पुढारी वृत्तसेवा : राजकीय वादातून तत्कालीत सरपंचावर धारदार हत्यारांना वार करून त्याचा खून करणाऱ्या 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश डॉ. एफ ए एम ख्वाजा यांनी आज सुनावली. तत्कालीन विशेष सरकारी वकील तथा विद्यमान जिल्हा सरकारी वकील ऍड देवेंद्रसिंह तंवर यांनी या प्रकरणात मांडलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. एखाद्या खुनाच्या गुन्ह्यात एकाच वेळी 14 जणांना जन्मठेप झाल्याची ही पहिलीच घटना धुळे जिल्ह्यात घडल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात येते आहे.
धुळे तालुक्यातील अनकवाडी शिवारात १८ मे २०१६ मधे हा भीषण प्रकार घडला होता. धुळे तालुक्यातील अनकवाडी येथे 2014 मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पितांबर दौलत चव्हाण हे विजयी झाले होते. तत्पूर्वी गावातीलच नंदू खिळे यांची पत्नी या सरपंच होत्या. या सरपंच पदाच्या राजकीय वादातूनच चव्हाण आणि खिळे या दोन गटांमध्ये राजकीय वैमनस्य होते. या वादातून या दोन्ही गटांच्या विरोधात काही गुन्हे देखील दाखल होते. दरम्यान 2014 मध्ये पितांबर चव्हाण हे सरपंच झाल्यानंतर 18 मे 2016 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते व मुलगा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने शेतामध्ये जात होते. त्याच वेळेस ट्रॅक्टर वरून नंदू गोविंद खिळे, दीपक गोविंद खिळे, कौतिक चिंतामण खिळे, प्रवीण अमृत क्षीरसागर, हिलाल नारायण मोरे, भटू वामन निंबाळकर, रमेश वामन निंबाळकर, सागर कारभारी खिळे, गणेश महादू मोरे, धनंजय उर्फ धनराज रोहिदास मोरे, विनायक कौतिक खिळे, कारभारी चिंतामण खिळे, पांडुरंग कौतिक खिळे, शरद गोविंद खिळे तसेच एक अल्पवयीन मुलगा अशा 15 जणांनी पितांबर चव्हाण यांना गाठून त्यांच्यावर कुऱ्हाड ,कोयत्याने हल्ला चढवला.
यावेळी या हल्ल्यात पितांबर चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन्हीही गंभीर जखमी झाले. ही मारहाण सुरू असताना अण्णा श्रावण सरोदे, तसेच दत्तू भाऊराव क्षीरसागर यांनी चव्हाण पिता पुत्रांची सुटका करून त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असलेल्या पितांबर चव्हाण यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे खूनाचा तसेच गंभीर मारहाण केल्याचे गुन्हे दाखल झाले.
या खटल्याचे कामकाज करण्यासाठी ऍड देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तंवर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. या खटल्याच्या कामात आरोपी नंदू खिळे याने घटना घडली त्यावेळेस तो एका हॉटेलमध्ये असल्याचा बचाव करुन घेतला. या प्रकरणात सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयात संबंधित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले गेले. यात कोणाचेही चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचा अभिप्राय नोंदवण्यात आला.
सरकार पक्षाच्या वतीने ऍड देवेंद्रसिंह तवर यांनी युक्तिवाद आणि साक्षीदार तपासणी मधून न्यायालयासमोर या सर्व आरोपींनी राजकीय वादातूनच हा खून केल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आरोपींच्या कपड्यावर मयत पितांबर चव्हाण यांचे रक्त लागलेले होते .त्याचप्रमाणे जप्त केलेले हत्यारांवर देखील मयताचे रक्त होते. ही बाब न्यायालयामध्ये मांडली. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचे युक्तिवाद निकाल देखील न्यायालयासमोर ठेवला. हे सर्व पुरावे पाहता न्यायालयाने सर्व 14 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलमांमध्ये देखील एक ते सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. या खटल्या कामी सरकारी वकील ऍड तवर यांना ऍड मयूर बैसाने, ऍड अमर सिसोदिया, पैरवी अधिकारी लक्ष्मण कदम यांचे सहकार्य लाभले.