धुळे : "मुला-मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकूया, पुढे जाऊया…", "चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला", "बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो" अशा उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी घोषणांनी तिखी (ता. धुळे) येथे शाळा प्रवेशोत्सवाला सुरुवात झाली. कुठे बैलगाडीतून, कुठे बग्गीतून नवागतांची मिरवणूक काढत, फुलांच्या वर्षावात आणि ढोल-ताशांच्या गजरात, शाळेच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली.
शाळा प्रवेशोत्सवात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, तिखी येथे इयत्ता पहिलीतील २४ नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, तहसीलदार अरुण शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी भारती भामरे, सरपंच कविता पाटील, विस्तार अधिकारी सतिलाल कोळी, मुख्याध्यापिका ललिता बोरसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब बेलदार यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे स्वागत: जिल्हाधिकारी विसपुते यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली. शालेय साहित्य वाटप: प्रतिनिधी स्वरूपात विद्यार्थ्यांना गणवेश, बूट व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या स्वयंपाकगृहाला भेट दिली.प्रवेशोत्सवापूर्वी गावातून विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली. फटाके, घोषणाबाजी, फुलांची सजावट यामुळे शाळा सणासारखी सजली होती.
"शाळा प्रवेशोत्सवामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो. हे उपक्रम राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रभावी ठरतील," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
शिक्षक विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. दर्पण देसले यांनी पार सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका भारती भामरे यांनी आभार मानले. या वेळी प्राथमिक शिक्षक कल्पना चौधरी, मनिषा केदार, कृष्णाबाई पाटील, कविता खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
दातरती (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार मंजुळा गावित, भोईटी (ता. शिरपूर) येथील शाळेत आमदार काशिराम पावरा, विखरण (ता. शिंदखेडा) येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे वडील, उद्योगपती सरकारसाहेब रावल, हेंद्रुण (ता. साक्री) येथील शाळेत पोलीस उपअधीक्षक शिल्पा पाटील यांनी नवागतांचे स्वागत केले.