Dhule Kokani Kokana Tribe Community
अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : आदिवासी कोकणी-कोकणा समाजात पंचमी सणाला विशेष महत्त्व आहे. निसर्गपूजक असलेल्या या समाजात हा सण पूर्वापार पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. पंचमीच्या दिवशी घरातील चुलीजवळील भिंत शेणाने सारवून त्यावर निसर्ग आणि प्राण्यांशी संबंधित विविध चित्रे रेखाटण्याची अनोखी परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते.
पंचमीच्या दिवशी भिंतीवर बांबूची बारीक काडी किंवा पिसांच्या कुंचलीचा वापर करून गाय, बैल, शेळी, नाग, वाघ, सिंह, औत, मानवी साखळी, झाडे, घर, चंद्र, सूर्य, तारे, पाऊस, साप, विंचू तसेच विविध पाळीव प्राण्यांची चित्रे रेखाटली जातात. या चित्रांमधून आदिवासी समाजाचे निसर्ग आणि प्राण्यांशी असलेले अतूट नाते अधोरेखित होते.
पूर्वी ही चित्रे रेखाटण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला पांढरा रंग वापरला जात असे. मात्र, सध्या सहज उपलब्ध होत असल्याने चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चित्रे रेखाटणे एवढ्यापुरताच पंचमीचा उत्सव मर्यादित नसून, या चित्ररूप निसर्गदेवतांचे विधिवत पूजनही केले जाते.
पंचमीच्या दिवशी प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ, विशेषतः कान्होळे, तयार केले जातात. सायंकाळी चुलीजवळील भिंतीवर रेखाटलेल्या चित्रांसमोर धान्य, पाणी आदी साहित्य ठेवून पूजा केली जाते. त्यानंतर तयार केलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीय एकत्रितपणे पंचमीचा सण साजरा करतात.
भिंतीवर रेखाटली जाणारी ही चित्रे आदिवासी समाजाच्या पारंपरिक चित्रकलेचा अनोखा नमुना मानला जातो. वारली चित्रकलेशी साधर्म्य असलेल्या या रेखाटनातून कोकणी-कोकणा समाजानेही चित्रकलेची परंपरा पिढ्यान्पिढ्या जपल्याचे दिसून येते. त्यामुळे हा समाज कलाप्रिय तसेच चित्रकलेचा पारंपरिक उपभोक्ता असल्याचेही या प्रथेतून स्पष्ट होते.
कोकणी-कोकणा समाजात निसर्गाशी संबंधित अनेक परंपरा आजही प्रचलित आहेत. त्यापैकी पंचमीच्या दिवशी भिंतीवर निसर्गदेवतांची चित्रे रेखाटून त्यांचे पूजन करण्याची परंपरा महत्त्वाची आहे. बदलत्या काळातही ही प्रथा जपली जात असून, आपल्या संस्कृती आणि परंपरांचे पुढील पिढीकडे हस्तांतरण व्हावे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे पंचमीचा हा सण केवळ धार्मिक उत्सव न राहता निसर्गपूजा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणारी परंपरा म्हणून आजही आदिवासी कोकणी-कोकणा समाजात जिवंत आहे.