Khandlay Budruk Gram Panchayat administration inquiry
सोनगीर (धुळे) : धुळे तालुक्यातील खंडलाय बु. ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि मनमानी कारभाराचे आरोप करत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी वारंवार गैरहजर असतात आणि संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नाही. गावातील अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवण्यात आली असून नागरिकांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांकडून भाडे वसुली होत नसल्याने आर्थिक शिस्त बिघडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच ग्राम रोजगार सेवकांच्या कामकाजात ढिलाई, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि काही कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गावातील पाणी फिल्टर प्रकल्प बंद अवस्थेत असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने अस्वच्छता वाढली आहे. अंगणवाडी बांधकामासह विविध विकासकामे रखडली असून मुख्य चौकातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, गटप्रमुख आबा पगारे यांनी पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. आमदारांनी बैठक बोलावूनही ग्रामपंचायत प्रशासनाला त्याची माहिती देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला. परिणामी गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सांडपाणी गटारांचे गळतीमुळे रस्त्यावर घाण पसरत असून दुर्गंधी व रोगराईचा धोका वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जबाबदार ग्रामसेवकाची नियुक्ती करून गावाचा कारभार सुरळीत करण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा प्रश्न पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.