धुळे : माजी आमदार व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे तालुक्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविणार आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार असून, ग्रामपंचायतींनी यासाठी तातडीने ठराव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जवाहर ट्रस्टने आजवर राबविलेल्या सिंचन मोहीमेमुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली असून, बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सन 2011 पासून सुरु असलेल्या या मोहीमेद्वारे नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण, बंधाऱ्यांचे दुरुस्ती व पुनरुज्जीवन, पाट कालव्यांचे संवर्धन अशी विविध कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असून, सिंचन क्षमताही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
दरवर्षी धरणांमध्ये साठणाऱ्या गाळामुळे साठवण क्षमता कमी होते. ही क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळ काढण्यात येणार असून, तो गाळ शेतजमिनीत टाकून मृदस्वरूप सुधारण्यात येईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे.
ही योजना शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व जवाहर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. यासोबतच नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचीही कामे हाती घेतली जातील.
आतापर्यंत 102 गावांमध्ये 400 हून अधिक बंधाऱ्यांचे खोलीकरण-रुंदीकरण
7 हजार हेक्टर शेतीला मिळालेला सिंचन लाभ
कन्हेरी, वाघी, पांझरे नद्यांवरील बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन
अनेक पाणीपुरवठा योजनांना लाभ, पाणी टंचाई कमी होण्यास हातभार लागेल.
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी संबंधित शिवारात असलेल्या धरण, तलाव, बंधाऱ्यांची माहिती आणि शेजारील शेतकऱ्यांची नावे नमूद करून ठराव तयार करावा. हा ठराव कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालय, जवाहर ट्रस्ट, देवपूर, धुळे येथे तातडीने सादर करण्याचे आवाहन जवाहर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.