Dhule Prisoner Escape 
धुळे

Dhule Prisoner Escape : धुळे कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; बंदोबस्ताच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

कारागृहाच्या मालकीच्या शेती विभागात कामासाठी नेण्यात आले असताना कैदी पसार

पुढारी वृत्तसेवा

धुळे : येवला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी धुळे कारागृहातून फरार झाल्याची घटना बुधवारी घडली. कारागृहाच्या मालकीच्या शेती विभागात कामासाठी नेण्यात आले असताना हा कैदी पसार झाला. या घटनेमुळे कारागृहातील बंदोबस्त आणि कैद्यांच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दया ऊर्फ कृष्णा अशोक वाघ याला येवला पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खूनप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली होती. शिक्षा बंदी क्रमांक सी/११७ असलेला दया ऊर्फ कृष्णा वाघ गेल्या वर्षभरापासून कारागृहाच्या मालकीच्या शेती विभागात नियमितपणे काम करत होता.

बुधवारी सकाळी त्याला अन्य दहा शिक्षा बंद्यांसह कारागृहाबाहेरील शेती विभागात कामासाठी नेण्यात आले होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास बंद्यांची उपस्थिती तपासली असता वाघ हा शेती विभागात आढळून आला नाही. त्यानंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी परिसरात त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. याबाबतची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने धुळे शहर पोलिस ठाण्याला कळविले. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. शहराबाहेर जाणारे महामार्ग, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरातही शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र वाघचा ठावठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान, यापूर्वीही धुळे कारागृहातून शिक्षा भोगत असलेला बंदी अशाच प्रकारे फरार झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी कारागृहातील बंदोबस्त आणि देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता पुन्हा जन्मठेपेचा कैदी कारागृहाबाहेरील शेती विभागातून पसार झाल्याने बंदोबस्ताच्या नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT