धुळे कारागृहात महिला न्याय बंदीने गळफास घेत संपविले जीवन  file
धुळे

Dhule | धुळे कारागृहात महिला न्याय बंदीने गळफास घेत संपविले जीवन, काय कारण?

शिक्षकाकडून खंडणी मागितल्याचे प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

धुळे | शिक्षकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिला न्यायबंदीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना आज घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आता कारागृहात महिला न्याय बंदी आणि अन्य न्याय बंदीच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धुळे जिल्ह्याबाहेर नेमणुकीस असणाऱ्या एका शिक्षकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी चंद्रमा बैरागी (वय 20) या मुलीस अटक केली होती. 18 जानेवारी रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने या मुलीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धुळे येथील कारागृहात संबंधित मुलीला पाठवण्यात आले. आज दुपारी अकरा वाजेच्या सुमारास महिला न्याय बंदी विभागात जेवण वाटप करण्यात आले. काही न्याय बंदी जेवणास बसल्या. मात्र चंद्रमा बैरागी या बाथरूमच्या मागील बाजूस गेल्या. बराच वेळ त्या आल्या नाही. त्यामुळे महिला न्यायबंदींनी ही बाब महिला रक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे महिला रक्षक या भागात तातडीने पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना ओढणीच्या मदतीने गजाला चंद्रमा यांनी गळफास लावून जीवन संपविल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तातडीने ही बाब जेल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात तुरुंग अधिकारी यांनी माहिती दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील आणि पथक कारागृहात रवाना झाले. दरम्यान जेल प्रशासनाच्या वतीने ही माहिती जिल्हाधिकारी स्तरावर देखील देण्यात आली असून पंचनामाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान कारागृहात न्यायबंदींना ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी शरीराला कोणताही अपाय करू नये, यासाठी त्यांची कसून झडती घेतली जाते. त्याचप्रमाणे नेमणुकीस असलेल्या रक्षकांची देखील त्यांच्यावर करडी नजर असते. कारागृहातील प्रत्येक भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाते. मात्र असे असताना महिला न्यायबंदीने ओढणीच्या मदतीने जीवन संपविल्याने कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात आता तुरुंग विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून होणाऱ्या चौकशीत या संदर्भातील उहापोह होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT