धुळे : पुलवामामध्ये शत्रूच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. आता पहलगाममध्ये निरपराध नागरिकांचे बळी गेले असताना पंतप्रधानांनी तेथे जाण्याऐवजी बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्राधान्य दिले. भाजपाने देशाला उत्तर द्यावे की, अशा प्रसंगी प्रचार महत्त्वाचा का वाटतो, असा सवाल भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
गोटे म्हणाले, "रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी मोदी युक्रेनला जाऊ शकतात, पण देशातील अशांत भागांचा उल्लेखही त्यांच्या भाषणांत दिसत नाही. पुलवामा, मणिपूर, पहलगाम, उटीसारख्या ठिकाणी '56 इंच छातीचे' पंतप्रधान जाण्यास घाबरतात काय?"
ते पुढे म्हणाले, "देशातील निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले असताना, पंतप्रधान बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये हसत-खेळत, टाळ्या वाजवत फिरतात. माताभगिनी दुःखाने टाहो फोडत असताना अशी वर्तणूक करणाऱ्यांना खरंच देशप्रेम आहे का?"
गोटे यांनी संघ विचारसरणीवरही सवाल उपस्थित केला. "पन्नास वर्षे संघाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर मी विचारतो, की निरपराध बळी गेल्यानंतर किमान तीन दिवस तरी शोक पाळायला शिकवलं नाही का?" असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला.
पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी प्रचार सभेत पाकिस्तानचा उल्लेखही केला नाही, याची आठवण करून देत गोटे म्हणाले, "पाकिस्तानचा उल्लेख टाळायचा का? का भीती वाटते? 2019 मध्ये पुलवामाच्या घटनेनंतरही, 400 किलो आरडीएक्स कुठून आले, हल्लेखोर कोण होते याचा तपास अद्याप लागलेला नाही. हे कशाचे हिंदू राष्ट्र?"
गोटे यांनी पहलगाम घटनेवर भाष्य करताना सांगितले की, "पहलगाम म्हणजे पुलवामा-2 आहे. दुर्दैवाने पुन्हा एकदा आपल्याला अशा शोकांतिका अनुभवावी लागली."
ते पुढे म्हणाले, "देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा एकही नेता बळी पडलेल्या कुटुंबीयांच्या भेटीस गेला नाही. काश्मीर सरकारने दहा लाख, महाराष्ट्र सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली, पण माणसाच्या प्राणाची किंमत पैशाने मोजायची का? या साऱ्या प्रकरणामुळे भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागावी," अशी मागणी गोटे यांनी केली.