धुळे

धुळे : कोकणगाव येथे पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

अविनाश सुतार

धुळे, पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याचा संशय घेत विवाहितेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्या प्रकरणात मद्यपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश एम. जे. बेग यांनी आज (दि.१८) सुनावली. Dhule News

याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री तालुक्यातील कोकणगाव येथे २१ जून २०१९ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. गोरख एकनाथ चव्हाण यांचा विवाह भारतीबाई यांच्या समवेत झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्य आहे. मात्र, गोरख चव्हाण हा कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला मद्यपानाचे व्यसन होते. या मद्यपानच्या आहारी गेल्यामुळे तो नेहमी भारतीबाई यांच्या चारित्र्यावर संशय देखील घेत होता. या छळाला कंटाळून भारतीबाई या मुलांसह साक्री तालुक्यातील कोकणगाव येथे तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. Dhule News

मात्र 21 जून 2019 रोजी आरोपी गोरख चव्हाण हा कोकणगाव येथे पोहोचून भारतीबाई यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी भारतीबाई या कपडे धुत होत्या. यावेळी तानाजी माळी तसेच दीपक माळी या दोघांनी गोरख याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हातात मोठा दगड घेऊन पत्नी भारतीबाई यांच्या डोक्यात टाकला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन भारतीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर गोरख चव्हाण हा घटनास्थळावरून पळून गेला.

दरम्यान, या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी गोरख चव्हाण याला अटक करून अधिक तपासा अंति न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश एम जे बेग यांच्यासमोर चालले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. पराग पाटील यांनी सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी सुखदेव गायकवाड तसेच काशिनाथ माळी, मयत विवाहितेचा भाऊ दीपक माळी तसेच डॉक्टर निलेश भामरे व कोरोना काळात तपास करणारे तत्कालीन पोलीस अधिकारी पंजाबराव राठोड यांची साक्ष झाली.

दरम्यान पंजाबराव राठोड हे मृत झाल्याने त्यांच्या स्वाक्षऱ्या ओळखण्यासाठी तत्कालीन पोलीस ठाणे अंमलदार प्रकाश लोहार यांची देखील साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची सिद्ध झाली. घटनास्थळी आरोपी उपस्थित होता. हे सरकार पक्षाने सिद्ध केले. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील उपस्थित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पराग पाटील यांनी न्यायालयाचे अनेक निर्णय सादर केले. त्यानुसार आरोपीला कठोर शिक्षा देण्याची विनंती केली. त्यानुसार सत्र न्यायाधीश एम. जे. बेग यांनी खुनाच्या गुन्ह्यात गोरख चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT