धुळे

Dhule Gutkha Smuggling : सीमा तपासणी नाक्यावर गुटख्याची तस्करी उधळली

ट्रकचालकास अटक; २६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

धुळे : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची तस्करी करण्याचा प्रयत्न शिरपूर तालुका पोलिसांनी हाणून पाडला. या कारवाईत ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी आणि ट्रक असा एकूण २६ लाख ३२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार तसेच पोलीस अंमलदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, राजू ढिसले, योगेश मोरे, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, सुनील पवार, दिनकर पवार आणि धनराज गोपाळ यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा रचला. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावरून जाणारा अशोक लेलँड ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि सुपारी आढळून आली. पोलिसांनी ट्रकचालक नाजीर मजिद (रा. ४९, भडास, मेवात) याला ताब्यात घेत अटक केली.

कारवाईत ५ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा आरएमडी पानमसाला (५७६ बॉक्स), १ लाख ४४ हजार रुपयांचा राफेल पानमसाला (१२०० पॅकेट), ५४ हजार रुपयांची विना लेबल सुगंधित तंबाखू (१२०० पॅकेट), २ लाख ४९ हजार रुपयांचा व्ही-७७ पानमसाला (२०८० पॅकेट), ६२ हजार ४०० रुपयांची व्ही-७००१ तंबाखू (२०८० पॅकेट), ३२ हजार ४०० रुपयांची राजू इलायची सुपारी (१०८० पॅकेट) आणि ७२ हजार रुपयांची राजू इलायची सुपारी गोल्ड (१४४० पॅकेट) जप्त करण्यात आली.

याशिवाय सुमारे १५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ट्रक जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २६ लाख ३२ हजार ६०० रुपये आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आरोपी नाजीर मजिद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT