धुळे : धुळे गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरजसिंग यांच्या हत्या प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि सर्व बाजूंनी तपास करण्यात यावा. या हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या व्यक्तींप्रमाणेच, या घटनेमागे कोणतेही संभाव्य षडयंत्र असल्यास त्याचाही शोध घेऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केली आहे.
तसेच धार्मिक स्थळांची सुरक्षा, समाजातील मान्यवर व्यक्तींचे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. धुळे शहरातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्याला जबर धक्का देणाऱ्या या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिल्लीहून धुळे दौऱ्यावर येताच सर्वप्रथम गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुद्वारातील नागरिकांशी संवाद साधला तसेच दिवंगत बाबा धीरजसिंग यांच्या नातेवाईक व निकटवर्तीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दिनांक १ डिसेंबर २०२५, सोमवार रोजी सकाळी, धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये सेवा कार्यात असताना उमेश माळोदे याने बाबा धीरजसिंग यांच्यावर भ्याड व अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात बाबा धीरजसिंग गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे शहर शोकसागरात बुडाले असून सर्वधर्मीय नागरिकांमध्ये तीव्र संताप, दुःख आणि असंतोषाची भावना पसरली आहे. शांतताप्रिय आणि सलोख्याने नांदणारा धुळे जिल्हा या अमानवी घटनेमुळे हादरून गेला आहे.
गुरुद्वारास भेट दिल्यानंतर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी सर्वधर्मीय व प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेतली. या बैठकीत बाबा धीरजसिंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. बच्छाव यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत सांगितले की, धुळे जिल्हा नेहमीच शांतताप्रिय राहिला असून अशा प्रकारच्या घटना शहराच्या परंपरेला काळीमा फासणाऱ्या आहेत. कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलता, तत्परता आणि पारदर्शकतेने कारवाई करणे आवश्यक आहे.
या बैठकीदरम्यान उपस्थित सर्वधर्मीय व प्रतिष्ठित नागरिकांनी बाबा धीरजसिंग यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची एकमुखी मागणी केली. शेवटी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी, गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग यांच्या भ्याड हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, हीच धुळेकर जनतेची एकमुखी भावना असल्याचे पोलीस प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले.
यावेळी डॉ. शोभा बच्छाव यांच्यासमवेत आई एकविरा देवी मंदीचे ट्रस्टचे सोमनाथ गुरव, फादर वेलसन रॉडरिक्स, जमीयत उलेमा हिंदचे धुळे शहर उपाध्यक्ष हाजी शव्वाल अन्सारी, धुळे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष हाजी साबीर शेठ, प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमराज पाटील, पप्पू सहानी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे व सुधीर जाधव, सेवा दलाचे शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, नगरसेवक परवेज शेख, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश बैसाणे यांच्यासह बाबा धीरजसिंग यांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि विविध धर्मांचे मान्यवर उपस्थित होते.