Dhule Government Employees Protest Pudhari
धुळे

Government Employees Protest | धुळ्यात कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीचा मोर्चा; घोषणाबाजीने परिसर दणाणला

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कल्याण भवन येथे कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Dhule Government Employees Protest

धुळे : सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाचा तिसरा दिवस आज उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. शहरातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कल्याण भवन येथे कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन आणि मोर्चा काढून शासनाचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले.

या आंदोलनानंतर कल्याण भवन येथून क्युमाईन क्लब, जेल रोडपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.

समन्वय समितीच्या प्रमुख मागण्या

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (१ मार्च २०२४ पासून लागू) संदर्भातील आवश्यक अटी-शर्ती व मार्गदर्शक सूचनांचे राजपत्र तातडीने प्रसिद्ध करणे, राज्यातील रिक्त पदे तातडीने भरणे, पदोन्नती प्रक्रिया वेगवान करणे, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देणे, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे यांचा समावेश आहे.

तसेच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लवकर जाहीर करणे, महागाई भत्ता वेळेवर मूलभूत वेतनात समाविष्ट करणे, पेन्शन विक्रीनंतर संपूर्ण पेन्शन १५ ऐवजी ११ वर्षांत पुर्ववत करणे, सर्व कर्मचाऱ्यांसाठी केरळ सरकारच्या धर्तीवर पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करणे आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे अशा मागण्या देखील मांडण्यात आल्या आहेत.

याशिवाय चतुर्थश्रेणी व वाहनचालकांची पदे सरळसेवेने भरणे, शाळा संच मान्यता आदेश रद्द करणे, टीईटी परीक्षा रद्द करणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करणे, तसेच अनुकंपा तत्त्वावर पात्र वारसांना वयोमर्यादा शिथिल करून सेवेत सामावून घेणे अशा विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या.

गेल्या दोन दिवसांपासून मुख्य सचिव स्तरावर समन्वय समितीशी चर्चा सुरू असली तरी अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी समन्वय समिती चे निमंत्रक डॉ संजय पाटील , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजेन्द्र माळी सरचिटणीस दिपक पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव,सचिव अविनाश मोरे, न्यायालयाचे सुधीर पोतदार, महिला कर्मचारी संघटनेच्या श्रीमती प्रतिभा घोडके,पल्लवी शर्मा, सोनल कौजलगी, किशोरी अहिरे हरणे, श्रीमती शैलजा चव्हाण, स्वाती वाघ,वन विभागाचे भुषण पाटील ,सुधीर खैरनार,, महसूलचे योगेश जिरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT