Dhule Fraud | उत्पादन शुल्क विभागात नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 17 लाखात फसवणूक, पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल Pudhari File Photo
धुळे

Dhule Fraud | उत्पादन शुल्क विभागात नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 17 लाखात फसवणूक, पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

अनेकांची अशीच फसवणूक झाली असल्याची पोलिसांची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

धुळे: उत्पादन शुल्क विभागामध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळ जनक प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणात आता पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारे आणखी अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता तपासात पोलीस प्रशासन तपासून पाहणार आहे.

धुळे येथील सत्संग कॉलनी मध्ये राहणारे सोनाली किशोर साळुंखे यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे. साळुंखे यांच्या बहिणीचा मुलगा रोहित किरण खैरनार हा शासकीय सेवेत संधी मिळण्यासाठी वेगवेगळ्या विभागात अर्ज करून प्रयत्न करीत होता. त्याला उत्पादन शुल्क खात्यात नोकरीस लावून देण्याचे आश्वासन सटाणा येथील रोशन राजाराम सैंदाणे, तसेच शिंदखेडा तालुक्यातील रहिमपूर येथे राहणारे तिलकचंद अंबर पाटील, हेमराज तिलकचंद पाटील, प्रतिभा तिलकचंद पाटील आणि किरण नामक यांनी दिले.

यासाठी संबंधितांना पैसे दिल्यास नोकरी मिळेल असा बनाव देखील त्यांनी तयार केला. यासाठी कटकारस्थान करुन 17 लाख रुपये रोख रक्कम घेतली. तसेच रोहित किरण खैरनार याच्या नावाने बनावट जॉईनिंग ऑर्डर बनवून ती खरी असल्याचे भासवून रोहित यास नोकरी न लावता फसवणूक केली. प्रत्यक्षात ही ऑर्डर देखील बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोहित खैरनार आणि साळुंखे यांनी या भामट्यांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष नोकरी लावली नाही. तसेच घेतलेले 17 लाख रुपये परत न करता विश्वासघात करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केली आहे. अशी तक्रारदारांची खात्री झाल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांच्याकडे हा प्रकार सांगितला.

प्राथमिक पुरावे पाहता कापडणीस यांनी ही घटना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भारतीय न्याय संहितेचे कलम 61 (1), 318(4), 316 (2), 336 (3), 340 (2),351 (2) (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या गुन्ह्यात संबंधित आरोपींनी आणखी अन्य कुणाची फसवणूक केली आहे किंवा कसे, याबाबत देखील पोलीस तपास करणार असून या सर्व घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण कोठुळे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT