धुळे : पुढारी वृत्तसेवा- कायनेटिक इलेक्ट्रिक वाहनांची डीलरशिप देण्याचे आश्वासन देऊन सुमारे दहा लाख 46 हजार 793 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा येथे राहणारे अजय कृष्णा सानप यांनी पुणे येथील कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन लिमिटेडच्या संकेतस्थळावर जिल्हा स्तरावर डीलरशिपची नेमणूक करण्यासंदर्भातील जाहिरात पाहिली होती. त्यानुसार अजय सानप यांनी डीलरशिप मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार या कंपनीच्या संचालिका सुजाता फिरादिया मोटवानी, कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन कंपनीचे रिलेशन अधिकारी अविनाश पांडे, अकाउंट मॅनेजर रब्बी कुमार तसेच व्यवस्थापक चंद्रजीतकुमार विजेंद्र प्रसाद यांच्या समवेत संपर्क आला. या चौघांनी अजय सानप यांचा विश्वास संपादन केला. त्यांना कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन कंपनीच्या जिल्हा स्तरावरील एजन्सी देण्याचे आश्वासन दिले. या मोबदल्यात त्यांनी 10 लाख 46 हजार 793 रुपये यूपीआय द्वारे स्वीकारले. मात्र पैसे घेऊन देखील सदर वाहनांच्या डीलरशिपचे कोणतेही काम न झाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे अजय सानप यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार आता भादवी कलम 420, 421, 424, 406, 120 ब सह आयटी ॲक्ट 65 व 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.