किर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात पाच भाविक ठार झाले (छाया : यशवंत हरणे)
धुळे

धुळे : किर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, पाच जण ठार

पुढारी वृत्तसेवा

धुळे : किर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात पाच भाविक ठार झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील होळ नजीक घडली आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपून (एम एच 18 बी एक्स 0 539) या क्रमांकाच्या ईको वाहनाने भाविक घरी परत जाण्यासाठी निघाले. त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील होळ नजीक दसवेल फाट्याजवळ आली. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एम एच 04 इ वाय 60 21) क्रमांकाच्या पिकअप वाहनाने भाविकांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली.

यांचा मृत्यू झाला

या भीषण अपघातात इको वाहनामध्ये बसलेले सुनील दंगल कोळी (कुवर ) वय 30, राहणार परसामळ, तालुका शिंदखेडा, मंगलाबाई लोटन देसले (वय 59) राहणार गांधी चौक, शिंदखेडा, विशाखा आप्पा माळी (महाजन) वय १३ ,राहणार धानोरा ,तालुका शिंदखेडा, मयुरी पितांबर खैरनार( परदेशी) वय 28, राहणार विजयनगर ,शिंदखेडा, जयेश गुलाब बोरसे, (वय 22), राहणार वारूड , तालुका शिंदखेडा ,यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जखमींना तत्काळ रुग्णालयात नेले

दोन्ही वाहनांचे चालकांसह सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळाल्याने नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले असून गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा अपघात झाल्याने मोठा आवाजामुळे गावातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यासाठी सहकार्य केले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस देखील घटनास्थळी पोहोचल्याने उर्वरित जखमींना रुग्णालयात वेळीच दाखल करणे शक्य झाले आहे. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT