धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला सरकारी रायफलमधून निघालेल्या गोळीने गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी (वय 48) यांना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना आज कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील वखार महामंडळाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामात घडली. या गोदामात मागील निवडणुकीतील ईव्हीएम सेट ठेवले आहेत आणि त्यासाठी कायम पोलीस बंदोबस्त आहे. ड्युटीवर असताना सूर्यवंशी यांच्या रायफलमधून खांद्याजवळ गोळी सुटली.
घटना कळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट दिली.
ही गोळी स्वतःहून झाडण्यात आली की, रायफल हाताळताना अपघाताने सुटली, याबाबत अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. सूर्यवंशी हे बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना घटनेचे नेमके स्वरूप समजलेले नाही.