धुळे जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावा घेताना खासदास संजय राऊत यांनी पंतप्रधान यांच्यावर साधला निशाणा (छाया : यशवंत हरणे)
धुळे

धुळे : पंतप्रधानावर गुन्हा दाखल करा; असे का म्हणाले खासदार संजय राऊत...

पुढारी वृत्तसेवा

धुळे : भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारी खर्चावर महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. पंतप्रधान हे कुण्या एका पक्षाचे नसून ते सर्वांचे असतात. पण सध्या पंतप्रधान हे भारतीय जनता पार्टी मधील एकाच गटाचे असल्यासारखे वागत आहेत. निवडणूक आयोगाने सरकारी पैशाची उधळपट्टी होत असल्याच्या घटनेची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धुळे येथे व्यक्त केले.

सरकारी खर्चावर भाजपाचा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा, खासदार संजय राऊत यांनी धुळे जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावाप्रसंगी मागणी केली.

धुळे जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत हे धुळ्यात आले आहेत. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधला. यावेळी संपर्क नेते अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, तसेच डॉ. सुशील महाजन ,भरत मोरे, हिलाल माळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. फेक नेरेटीव सेट करण्यासाठी जनता पार्टीचा कारखाना आहे. संघ परिवार निवडणुकीत उतरणार असल्याचे कोणी म्हणत असेल तर हा फेक नेरेटीवच म्हटला पाहिजे. यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, असे म्हटल्याचे ऐकले आहे. पण संघ ही राजकीय संघटना असल्याचे त्यांनी म्हटले असेल तर ही बाब तपासून पहावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

'वोट जिहाद' - भारतीय जनता पार्टीचा फेक नेरेटीव

वोट जिहाद हा प्रकार देखील भारतीय जनता पार्टीचा फेक नेरेटीव असून यासाठी श्वेतपत्रिकाच काढावी लागेल. यापूर्वी 2014 मध्ये मुस्लिम समाजाने अनेक राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांना भरभरून मतदान केले. त्यावेळी तो वोट जिहाद नव्हता का, आज मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केले म्हणून तो त्यांच्या दृष्टीने वोट जिहाद ठरतो. या देशांमध्ये मोदींना मतदान करणारा मतदार हाच खरा मतदार असल्याचे भारतीय जनता पार्टीला वाटते, असा टोला त्यांनी लावला आहे.

सरकारी खर्चावर होताहेत दौरे

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील दौरे करीत आहेत. ते गल्लीबोळात फिरत आहेत. पण पंतप्रधान हे सध्या एकाच गटाचे असल्यासारखे वागत आहेत. सरकारी खर्चावर ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी हे दौरे करत आहेत. सरकारी यंत्रणेचा त्यासाठी वापर करीत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन गुन्हा दाखल केला पाहिजे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

'गुवाहाटी' येथे आमदारांना गुंगीचे औषध

यावेळी खासदार संजय राऊत यांनी पक्ष फुटीच्या वेळी सुरत आणि गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांना गुंगीचे औषध दिले गेले असल्याची तक्रार त्याचवेळी आपल्याकडे काही आमदारांनी केल्याचे म्हटले. या आमदारांची मानसिक स्थिती पाहता त्यांच्यावर तसा प्रयोग झाला असावा, अशा संशयाला वाव आहे. आमदार नितीन देशमुख यांनी तर त्यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा उघड आरोप केला असून ते रुग्णालयातून निघून आले होते, असे देखील राऊत यांनी सांगितले.

गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टिकेची तोफ

यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टिकेची तोफ डागली. पुणे जिल्हा हा सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात विद्वानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महात्मा फुले, लोकमान्य टिळक ,आगरकर यांच्यासारख्या महान विभूतींनी या जिल्ह्यातून मोठे कार्य उभे केले आहे. पण आज हा जिल्हा गुन्ह्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. हे गृहमंत्री फडणवीस यांचे पाप असून त्यांचे फेल्युअर देखील आहे. गृहमंत्री यांचे पोलीस यंत्रणाच ऐकत नसल्याचे चित्र दिसत असल्याची टीका देखील यावेळी राऊत यांनी केली आहे.

आमदार अनिल गोटे हे आपले मित्र तर हिलाल माळी हे निष्ठावान

दरम्यान धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या भेटी संदर्भात खासदार राऊत यांनी ते आपले मित्र असल्याचे म्हटले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी खानदेशात अनेक आंदोलने केली. राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आपण धुळे भेटीत त्यांना भेटण्यासाठी जाणार होतो. पण ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली. दरम्यान, मी धुळ्यात आलो असल्याची माहिती गोटे यांना मिळाली. त्यामुळे ते माझ्या भेटीसाठी आले. यावेळी धुळे जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर निश्चितच चर्चा झाली. दोन राजकीय नेते भेटल्यानंतर त्यांच्यात राजकीय चर्चा होणे अपेक्षितच आहे. राजकारणामध्ये निवडून येण्याची क्षमता देखील पाहिली जाते, असे सांगत असतानाच 2019 मध्ये शिवसेनेचे हिलाल माळी यांना धुळे ग्रामीण मधून निवडणूक लढवायची होती. मात्र हा मतदारसंघ आपल्याला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी धुळे शहरातून निवडणूक लढवली. हिलाल माळी हे निष्ठावानच आहेत असे देखील त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT