धुळे : राज्यात एका बाजूला भोंदू बाबा अशोक खरात याच्या कृत्यामुळे संतापाची लाट असतानाच, धुळ्यातूनही अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःला 'भगत' म्हणवून घेणाऱ्या एका भोंदू बाबाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी मुख्य संशयित भोंदू बाबासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवपूर परिसरातील कदमबांडे नगर येथे राहणारा कृष्णा ऊर्फ भगत सुभाष चित्ते याने गेल्या वर्षी मे महिन्यात पीडित मुलीला आपल्या घरी बोलावले होते. तिथे त्याने मुलीवर अत्याचार केला आणि या कृत्याचे चित्रीकरण (व्हिडीओ) केले. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो गेल्या एक वर्षापासून पीडितेवर वारंवार बलात्कार करत होता.
या नराधम भोंदू बाबाने केवळ स्वतःच अत्याचार केले नाहीत, तर आपल्या एका अल्पवयीन साथीदारालाही यात सामील करून घेतले. त्या साथीदारानेही पीडितेचे लैंगिक शोषण केले. भीतीपोटी पीडित मुलगी हा सर्व छळ निमूटपणे सहन करत होती.
पीडितेच्या वागण्यातील बदलामुळे तिच्या आजीला संशय आला. त्यांनी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे आपली शंका बोलून दाखवली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मुलीला विश्वासात घेतले असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. नागरिकांच्या मदतीने तत्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी कृष्णा ऊर्फ भगत सुभाष चित्ते (रा. कदमबांडे नगर, देवपूर) व साथीदार एक अल्पवयीन मुलगा (रा. संत सेना नगर) या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि इतर कलमान्वये कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, अशा भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.