पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसानंतर अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यात आले.  Pudhari News Network
धुळे

Dhule : पांझरा नदीचे अतिरिक्त पाणी पोहोचले सोनवद धरणात

आमदार राम भदाणे यांच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही

पुढारी वृत्तसेवा

धुळे : पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसानंतर अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यात आले. हे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्याने, ते वाया न जाता योग्य नियोजनाने उपयोगात आणावे, अशी सूचना आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी पाटबंधारे विभागाला केली होती.

आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या सूचनेची दखल घेत कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल व उपविभागीय अभियंता विवेक महाले यांनी तातडीने कुंडाणे फिडरवरून कालव्यात पाणी सोडले. यामुळे कुंडाणे, वरखेडी, न्याहळोद, कापडणे, धनुर, निमखेडी या गावांच्या तलावांमध्ये पाणी पोहोचले असून, पुढील टप्प्यात सोनवद धरणही भरले जाणार आहे.

धुळे ग्रामीण मतदारसंघातील अनेक भागांमध्ये पावसाळ्यानंतर पाणीटंचाई जाणवते. यंदाही जुलैमध्ये समाधानकारक पावसाअभावी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आमदार भदाणे यांनी सोमवार (दि. ७ जुलै) रोजी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कालव्यांमार्फत तलाव आणि सोनवद धरणात वळविण्याची मागणी केली होती. अवघ्या दोन दिवसांत त्यावर कार्यवाही करण्यात आली.

योग्य नियोजनामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या सुविधेलाही चालना मिळणार असून, भविष्यातील टंचाई टाळण्यास मदत होणार आहे, असा विश्वास आमदार भदाणे यांनी व्यक्त केला.

कापडणे गावात पाणी पोहोचताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नवल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, भिकन पाटील, शरद पाटील, ललित बोरसे आदी उपस्थित होते. आमदार प्रतिनिधी राहुल पाटील यांनीही या कार्यात मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT