धुळे : धुळे जिल्हा हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडला जातो. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच दुष्काळ, नापिकी या नैसर्गिक संकटाशी झुंजत आला आहे. या जिल्ह्यात पावसाचे सरासरी प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी धुळे जिल्ह्याचा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) प्रकल्पात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
धुळे जिल्ह्याचा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेत समावेश करण्यात यावा म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित व कल्याण लक्षात घेऊन कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, धुळे जिल्हा हा आवर्षण प्रवण क्षेत्र असून त्यात धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर या चार तालुक्यांचा समावेश होतो. या चारही तालुक्यात पावसाचे सरासरी प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे बहुतांश शेती फक्त खरीप हंगामातच केली जाते. मात्र धुळे जिल्ह्याचा नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी (पोखरा) प्रकल्पात समावेश करण्यात आलेला नसल्यामुळे कृषी विभागाला प्राप्त होणारा निधी त्याप्रमाणात कमी प्राप्त होतो. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना अनेक योजनेत इच्छा असून सहभागी होता येत नाही. परीणामी त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावे लागते.
सध्या कृषी विभागात जागतीक बँक अर्थसहाय्य नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी (पोखरा) प्रकल्प राबविला जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे दुष्काळी भागातील सुपीक शेत जमिनीत रुपांतर करणे, दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळ मुक्त करणे, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणे, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, कृषी उत्पादकता वाढवणे, मातीचे आरोग्य वाढवणे, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे इत्यादी उद्दीष्टे साध्य करण्यासाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सवलतींच्या माध्यमातून मदत केली जाते. यात धुळे जिल्ह्याचा समावेश केला तर अधिक निधी प्राप्त होऊन सामान्य शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. म्हणून धुळे जिल्ह्याचा नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी (पोखरा) प्रकल्पात समावेश करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केली आहे.