fertilizer File Photo
धुळे

शेतकऱ्यांसाठी दिलासा! धुळे जिल्ह्याला १ लाख १२ हजार टन खतांचा पुरवठा होणार

कृषी सेवा केंद्रांनी ई पॉस मशीनद्वारे खतांची विक्री करावी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : खरीप हंगाम २०२६ करीता खतांच्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाकडून नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यासाठी १ लाख १२ हजार ७०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी दिली आहे.

खतांच्या आवंटनात ५१ हजार टन युरिया, डीएपी सहा हजार ४७० टन, एमओपी ४ हजार ९३९ टन, एसएसपी १९ हजार ७२० टन, कॉम्प्लेक्स ३८ हजार ४४२ टनांचा समावेश आहे. मागील हंगामातील मार्च २०२६ अखेर ४६ हजार ४९८ टन खतांचा साठा उपलब्ध असून आतापर्यंत 49 हजार 967 टन खत साठा उपलब्ध आहे.

युरियाचा बफर संरक्षित साठा जिल्ह्यासाठी ४ हजार ९०० टन, डीएपीचा ३०० टनांचा लक्षांक आहे. १७ एप्रिल २०२६ अखेर एक हजार ८०० टन युरिया बफर संरक्षित साठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून मंजूर आवंटननुसार वेळोवेळी उपलब्ध होणार आहे. खतांची खरेदी करताना आधार कार्डद्वारे ई- पॉस मधून खरेदी अनिवार्य आहे. जिल्ह्यात एकूण ५३० खत विक्री करणारे कृषी सेवा केंद्र असून १६ एप्रिल २०२६ अखेर १७७ कृषी सेवा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातील ४८ कृषी सेवा केंद्र तपासणीत त्रुटी आढळल्याने त्यांची सुनावणी होणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. खतांची साठेबाजी कुणीही करू नये. तसे आढळून आल्यास कृषी विभागातर्फे गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी सेवा केंद्रांनी ई पॉस मशीनद्वारेच युरियाची विक्री करावी, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT