Farmer Loan Waiver Scheme 2026 pudhari photo
धुळे

Dhule Farmers Loan Waiver | धुळे जिल्ह्यातील आणखी २३१ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर; पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Farmer Loan Waiver Relief

धुळे : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत धुळे जिल्ह्यातील आणखी २३१ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभरातील १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांना या यादीमुळे कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पात्र शेतकऱ्यांनी कर्जथकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

चौथ्या यादीतील धुळे जिल्ह्यातील २३१ शेतकऱ्यांपैकी १८२ शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, तर ४९ शेतकरी अन्य बँकांचे खातेदार आहेत. नाशिक विभागातील १४ हजार १६५ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे.

राज्यात २५.८२ लाख शेतकऱ्यांचा समावेश

योजनेच्या पहिल्या तीन याद्यांमध्ये अनुक्रमे १६ लाख ९६ हजार २०१, ४ लाख १९ हजार ७३७ आणि ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली होती. चौथ्या यादीतील लाभार्थ्यांसह चारही याद्यांतील पात्र शेतकऱ्यांची एकूण संख्या २५ लाख ८२ हजार ८२७ झाली आहे.

राज्यातील बँकांनी ३१ लाख १७ हजार थकीत कर्जखात्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर नोंदवली आहे. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे १५ लाख ८५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

२ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीककर्जे आणि पुनर्गठित कर्जांचा योजनेत समावेश आहे. ३१ मार्च २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्याची तरतूदही असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

चौथ्या यादीतील शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपले नाव तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. त्यानंतर नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा होईल.

मयत लाभार्थी तसेच वृद्धत्वामुळे किंवा अन्य कारणांमुळे बोटांचे ठसे नोंदवण्यात अडचण येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने स्वतंत्र मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT