धुळे : विद्यमान केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुखांनी धनगर समाजाची घोर फसवणूक केली असून या फसव्या राजकारण्यांना जाग आणण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे नेते दीपक बोराडे यांनी केले. दरम्यान, येत्या 15 ऑक्टोबरला धुळे शहरात धनगर समाजाचा आरक्षण मोर्चा व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या जनजागृतीसाठी बोराडे हे कार्यकर्त्यांसह धुळे जिल्ह्याचा दौरा करत आहेत.
या दौऱ्या दरम्यान त्यांनी रविवार, दि. 4 ऑक्टोबर, २०२६ रोजी सोनगीर येथील धनगर समाज बांधवांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. त्यांच्यासोबत मेंढपाळ धनगर समाजाचे तरुण नेतृत्व व उद्योजक लखन रुपनर हे होते.
यावेळी बोराडे समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर देशात व महाराष्ट्रात रानोमाळी हिंडणाऱ्या भटक्या धनगर समाजाची सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तिच्यात आजही फारसा फरक पडलेला नाही. यामुळे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले. परंतु धनगर ऐवजी धनगड असा शब्दप्रयोग आल्याने आजपर्यंत या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकलेला नाही.
आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून समाज केंद्र व राज्य शासनाची झगडत आहे. पण केवळ खोट्या आश्वासनाशिवाय समाजाला काहीही मिळालेले नाही. हा समाज कायम राजकारण्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेला आहे. वर्तमान राज्य सरकारच्या प्रमुखांनी तर तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा परिपूर्ण प्रस्ताव/ शिफारस केंद्र शासनाकडे पाठवू असे जाहीर सभेत आश्वासन दिले होते. आता बारा वर्षांचा कालावधी उलटला तरी ते हे आश्वासन पाळण्यात ते टाळाटाळ करत आहेत.
येत्या 15 ऑक्टोबरच्या धुळे येथील मेळावा व मोर्चात जास्तीत जास्त समाज बांधवांनी महिला, तरुण मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक लखन रुपनर, सोनगीर प्रभारी सरपंच लखन ठेलारी, माजी सरपंच दंगल दंगल, धनगर समाजाचे उपाध्यक्ष मोहन धनगर, ज्येष्ठ कार्यकर्ते शांतीलाल धनगर, नंदू धनगर, भटू धनगर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रमोद धनगर यांनी केले. तरुण मंडळी विनोद धनगर, दादाभाई धनगर,मनोहर धनगर, योगेश बागुल, गिरीश धनगर, सतीश बागुल, दगडू धनगर, राहुल धनगर, दिपक धनगर, अमोल धनगर, पराग धनगर, दिपक धनगर, भटू धनगर, सचिन धनगर, स्वप्नील धनगर, लोकेश धनगर, हर्षद धनगर, विकास धनगर, योगेश धनगर, सुदाम धनगर, लीलाधर धनगर, जय धनगर, प्रदीप धनगर, सागर लांडगे, आशिष धनगर, निलेश धनगर, हितेश धनगर, मयूर धनगर, रुपेश धनगर, ललित धनगर, सोनू धनगर, सुजल धनगर, भूषण धनगर, वैभव धनगर मोठ्या संख्येने उपस्थित होते.