धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी गावात घरफोडी करून आणि किराणा दुकानांचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी तब्बल १,५४,५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी अशोक माधवराव सूर्यवंशी (वय ७२, रा. मोहाडी प्र. डांगरी, ता. जि. धुळे) तसेच संजय अमृतलाल गुजर आणि मधुकर बाबुराव खैरणार यांच्या किराणा दुकानाचे कुलूप अज्ञात चोरांनी लबाडीच्या इराद्याने तोडले. चोरांनी घरातून व दुकानातून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,५४,५०० रुपयांचा माल चोरून नेला.
यामध्ये फिर्यादी अशोक सूर्यवंशी यांच्या घरातून १९,००० रुपये रोख, १० ग्रॅम वजनाची चांदीची ४ लक्ष्मीची नाणी, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ७ ग्रॅम वजनाचे डोंगल, अर्धा ग्रॅम वजनाच्या ४ अंगठ्या आणि १५ ग्रॅम वजनाची लहान माळ चोरीस गेली. तसेच संजय अमृतलाल गुजर यांच्याकडील ५०,००० रुपये रोख, चांदीचे ब्रेसलेट, चांदीची साखळी, चांदीची चेन, पायातले चांदीचे बेले, सोन्याची बाळी, सोन्याची नथ आणि ३ ग्रॅम वजनाचे टॉप्स तसेच मधुकर बाबुराव खैरणार यांच्या किराणा दुकानातून १५,००० रुपये रोख लांबवण्यात आले.
या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.