धुळे : शिंदखेडा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न अत्यावश्यक अलार्म वाजल्याने फसला आहे. एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीचा गुडगाव येथून पोलीस प्रशासनाला फोन आल्याने तातडीने पोलीस पथक एटीएम सेंटरवर पोहोचले. त्यामुळे चोरट्याने पलायन केले. या एटीएम सेंटर मधील सुमारे नऊ लाखाची रोकड वाचली आहे. दरम्यान आता चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
शिंदखेडा येथे स्टेट बँकेचे एटीएम सेंटर एसआयएस सिक्युरिटी कॅश मॅनेजमेंट सिस्टम या कंपनीच्या माध्यमातून चालवले जाते. या कंपनीच्या गुडगाव येथील कार्यालयात अलर्ट मेसेज आला. यावरून शिंदखेडा येथे एटीएम सेंटर मध्ये छेडछाड सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कंपनीने तातडीने धुळे जिल्हा पोलिसांना ही माहिती कळवली. त्यावरून शिंदखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी या एटीएम सेंटर जवळून काळ्या रंगाची बोलेरो पिक अप व्हन आणि चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे या बोलेरो मध्ये तीन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येते आहे .या चोरट्यांनी एटीएम सेंटर मधील मशीनला दोराच्या साह्याने बांधून बोलेरो गाडीने जोरात ओढले. त्यामुळे एटीएम सेंटरची काच देखील फुटली. याचा मोठा आवाज आला. यावेळी एटीएम सेंटरच्या वर असणाऱ्या बँकेत काही कर्मचारी हजर होते. मात्र चोरट्यांकडे हत्यार असल्याच्या भीतीने त्यांनी प्रतिकार करू शकले नाही. याच दरम्यान पोलीस पोहोचले. त्यामुळे एटीएम सेंटर मधील रोकड चोरीस जाण्यापासून वाचली. मात्र चोरट्यांनी पलायन केले. ही माहिती कळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मदतीने तातडीने पथके तयार केली आहेत .या पथकाच्या माध्यमातून गुजरात आणि मध्य प्रदेश कडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही मधील फुटेज तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.