Murder File Photo
धुळे

Dhule Crime: शिरपूर हादरले! पत्नीसमोर अपमान करतात म्हणून मुलानेच केला आई-वडिलांचा खून

पायरीवरून पडल्याचा बनाव उघड

पुढारी वृत्तसेवा

शिरपूर : पत्नीसमोर आई-वडील अपमानजनक बोलतात, या रागातून पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्यांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरपूर शहरात घडली आहे. आई-वडील पायरीवरून घसरून पडल्याचा बनाव रचणाऱ्या या नराधम मुलाला शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

मूळचा बिहार राज्यातील (ग्राम गोकुळ, जि. दरभंगा) असलेला चंदनकुमार गंगा महातो (वय २५) हा तरुण रोजगारासाठी शिरपूरमध्ये वास्तव्यास होता. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणाऱ्या चंदनकुमारसोबत त्याचे आई-वडील आणि पत्नी राहत होते. गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास त्याने आपल्या मित्रांना फोन करून आई-वडील पायरीवरून घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात न्यायचे आहे, असे सांगून घरी बोलावले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने गंगा महातो (वय ५०) आणि रणजुदेवी महातो (वय ४३) या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेनंतर संशय आल्याने एका स्थानिक नागरिकाने तात्काळ शिरपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चंदनकुमारची चौकशी केली. सुरुवातीला त्याने 'आई-वडील पायरीवरून पडले' किंवा 'त्यांचे आपसात भांडण झाले' असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

आरोपी चंदनकुमारने पोलिसांना सांगितले की, आई-वडील त्याच्या पत्नीसमोर नेहमी त्याला अपमानजनक बोलत असत. घटनेच्या दिवशीही असाच प्रकार घडल्याने संतापाच्या भरात त्याने आई आणि वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे शिरपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलिसांनी आरोपी चंदनकुमार महातो याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT