Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील वन विभागाच्या क्षेत्रातून 7 कोटी 67 लाख रुपयांचे गांजाचे पीक उध्वस्त! 
धुळे

Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील वन विभागाच्या क्षेत्रातून 7 कोटी 67 लाख रुपयांचे गांजाचे पीक उध्वस्त!

अतिदुर्गम कोणतेही वाहन जाणार नाही अशा ठिकाणी केली लागवड

पुढारी वृत्तसेवा

धुळे: शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा या अतिदुर्गम भागात वन विभागाच्या हद्दीतील वेगवेगळ्या शेतातून सुमारे 7 कोटी 67 लाख रुपये किमतीचे गांजाचे पीक शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने नष्ट केले आहे. या संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव दोंदवाडा या परिसरात वनविभागाचे जमिनीवर अतिदुर्गम डोंगराळ भागात अज्ञात इसमांनी प्रतिबंधित कॅनाबीस वनस्पतीची (गांजा पिकाची) बेकायदेशीरपणे लागवड केली असल्याची गोपनिय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांना मिळाली.

बातमीप्रमाणे खात्री करुन अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याचे हद्दीतील कक्ष क्र. 1008 नियत क्षेत्र महादेव दोंदवाडा येथील 5 वेगवेगळया ठिकाणी हे क्षेत्र असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा कॅनाबीस वनस्पती (गांजा सदृश्य) अंमली पदार्थ अवैधरित्या लागवड केल्याने छापा टाकला. पोलीस पथकाने वेगवेगळ्या शेतांमधून 7 कोटी 67, लाख रुपये किंमतीचा एकुण 3068 किलो कॅनाबीस अंमली वनस्पतीचे उभे पिक (गांजाची झाडे) हस्तगत करण्यात आली.

कॅनाबीस अंमली वनस्पतीचे उभे पिक (गांजाची झाडे) अतिदुर्गम भागात असल्याने व तेथे कोणतेही वाहन नेणे शक्य नसल्याने एनडीपीएस कायदा कलम 48 मधील कायदेशीर तरतुदीनुसार गांजाची झाडे उपटुन वेगवेगळे ढीग करुन जागेवरच जाळुन नाश करण्यात आले. यासंदर्भात अज्ञात इसमांविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायदा कलम 8 (क), 20(अ) (i), 28 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, , वनपरिक्षेत्रीय अधिकारी कैलास सोनवणे (वन्यजिव-शिरपूर), पोउनि हेमंत खैरनार, पोउनि मिलींद पवार आणि पोलीस अंमलदार संजय चव्हाण, मोहन पाटील, राजु ढिसले, संदीप ठाकरे, जाकीरोद्दीन शेख, दिनेश सोनवणे, रोहिदास पावरा, संजय भोई, भुषण पाटील, सुनिल पवार, गिरधर पाटील व होमगार्ड मोतीलाल पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT