धुळे : रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकाकडून वीस हजाराची लाच स्वीकारणारा ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी आणि त्याच्या दोन पंटरला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अधिकृतपणे कोणतीही परवानगी नसताना पांझरा नदी पात्रातून होत असलेल्या रेती तस्करीचे बिंग फुटले आहे. महसूल विभागाच्या अशा लाचखोरांमुळेच गौण खनिजाची तस्करी होत असल्याची बाब ऐरणीवर आली आहे.
धुळे जिल्ह्यात शासन आणि जिल्हा प्रशासनाने रेती उपसा करण्यासाठी अधिकृत टेंडर दिलेले नसताना पांझरा आणि तापी नदी मधून मोठ्या प्रमाणावर अवैधपणे रेतीचा उपसा होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. मात्र या तक्रारीकडे महसूल विभाग सोयीस्करपणे डोळे झाक करीत असल्याचा आरोप देखील होत आहे.
अखेर आज झालेल्या लाचखोरांवरील कारवाईमुळे या रेती तस्करीत महसूल विभागाचे काही महाभाग सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्राम महसुल अधिकारी तथा कौठळ येथील अतिरिक्त तलाठी पदाचा पदभार असणारे मोहीत बाबासाहेब वारे व खासगी पंटर प्रदीप विश्वास पाटील (रा. कौठळ ता.जि.धुळे), स्वप्निल रामकृष्ण देसले( रा. वाडीभोकर रोड, धुळे) या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाई मधील तक्रारदार यांचा बांधकाम मटेरीयल वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्या वाहनांमधून दिड महिन्यापुर्वी पांझरा नदी मधुन रेतीची वाहतुक करुन अमळनेर येथे घेवुन जात असतांना एक व्यक्ती प्रदीप पाटील हे तक्रारदारास भेटले. मी तलाठी मोहीत वारे यांचे काम पाहतो, तुम्हाला आमच्या गावातुन रेती भरायची असेल तर मी तलाठी यांच्याशी बोलुन तुमच्या गाडया रेती भरुन आमचे गावातुन पास करुन देईल. त्यासाठी तुम्हाला तलाठी मोहीत आप्पा यांना भेटुन घ्यावे लागेल, नाहीतर ते रेती वाहतुक करतांना तुमची गाडी अडवुन तुमच्यावर कारवाई करतील. असे प्रदीप पाटील यांनी सांगितले.
त्यांना पांझरा नदी कौठळ येथुन रेती वाहतुक करायची असेल तर प्रत्येक गाडी मागे २५ रु , द्यावे लागतील. तसेच यापुर्वी दोन गाडया रेती भरुन नेली , त्यावेळेस तुम्ही मोहीत आप्पा यांना भेटले नाही. त्यामुळे ते तुमच्या वाहनावर अवैध गौण वाहतुकीचा गुन्हा दाखल करणार आहे. तरी तुम्ही मोहीत आप्पा यांना भेटुन त्यांची काय मागणी आहे, त्याप्रमाणे त्यांना पैसे देवुन टाका, असे सांगितले.
या तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी मोहीत वारे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रु. लाच स्विकारण्याचे मान्य केले. तसेच खाजगी इसम प्रदीप विश्वास पाटील यांनी आलोसे वारे यांच्या करीता २० हजार रु ची लाचेची मागणी करून ती देण्यास तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
त्यानुसार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत ,धुळ्याच्या पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, व पथकाने या लाचखोरांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला. तलाठी मोहीत वारे यांनी तक्रारदार यांच्याकडुन २० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी या लाचखोरांना ताब्यात घेतले.