धुळे

Dhule Crime : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; ४४ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त, कंटेनरसह चालक जेरबंद

धुळ्याच्या सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने तस्करीचा हा डाव उधळून लावला.

पुढारी वृत्तसेवा

धुळे : चंदीगड येथे विक्रीसाठी तयार करण्यात आलेले विदेशी मद्य महाराष्ट्रात तस्करी करून काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने आणल्याची बाब उघड झाली आहे. धुळ्याच्या सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने तस्करीचा हा डाव उधळून लावला. या कारवाईत सुमारे ४४ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दारूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरून मध्य प्रदेशातील सेंधवाकडून धुळ्याकडे वाहन (क्र. RJ 32 GB 4036) मधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे समजताच त्यांनी शोधपथकाला वाहन अडवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्टवर संशयित वाहन अडवण्यात आले. चालकाकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव सतीशकुमार पुडाराम जाट (रा. चंदना, जि. कैथल, हरियाणा) असल्याचे सांगितले. कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मजुरांच्या सहाय्याने आणि पंचांसमक्ष कंटेनरचे सील तोडून झडती घेतली असता, त्यात 'ऑल सीजन्स', 'अंकल टॉम' आणि 'रॉयल चॅलेंज' कंपनीच्या विदेशी दारूचे खोके आढळले. या बाटल्यांवरील लेबलवर 'ओन्ली फॉर सेल इन चंदीगड' असे नमूद होते. यावरून महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून ही दारू विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कंटेनरसह एकूण ४४ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार विजय ढिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम ३१८(१) सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकास ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT