धुळे : शिरपूर तालुक्यातील चिलारे गावाच्या शिवारात अवैधरीत्या गांजाचा साठा करून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत सुमारे 42 लाख 35 हजार रुपये किमतीचा 605 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रविंद्र गणेशा पावरा (रा. चिलारे) हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
चिलारे शिवारातील टिटवा गावाकडील रस्त्यालगत असलेल्या शेतातील घरात रविंद्र पावरा याने गांजा साठवून ठेवला होता. तो गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
पोलीस उप निरीक्षक अमित माळी, जयपाल हिरे, सुनील वसावे, आरीफ पठाण, तसेच पथकातील इतर कर्मचारी यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. त्यांनी शेतातील घराजवळ छापा टाकून गांजाचा साठा हस्तगत केला. याप्रकरणी आरिफ रमजान पठाण यांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.