Dhule Crime | किरकोळ कारणावरून आईला पेटवून ठार करणारा नराधम धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात  
धुळे

Dhule Crime | किरकोळ कारणावरून आईला पेटवून ठार करणारा नराधम धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात

धुळे तालुक्यातील महिंदळे शिवारात मुलाने आपल्या वृद्ध आईला पेटवून ठार मारले

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर शहरात आपल्या जन्मदात्या माता पित्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता धुळे तालुक्यातील महिंदळे शिवारात मुलाने आपल्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून तिला पेटवून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महिंदळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नराधम मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे तालुक्यातील महिंदळे येथे राहणाऱ्या जिजाबाई भटू खैरनार (वय 65) असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. त्या त्यांचा मुलगा प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार (वय 45) याच्या समवेत राहात होत्या. प्रदीप खैरनार याचा विवाह झाला नव्हता. तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू प्राशन केल्यानंतर तो नेहमी आईला वेगवेगळ्या कारणावरून शिवीगाळ करून वाद घालत असल्याची माहिती पुढे आली आहे.

तसेच अविवाहित असल्यामुळे त्याचा विवाह का लावून देण्यात आला नाही, या कारणामुळे देखील प्रदीप हा नेहमी आईशी आई समवेत वाद घालत होता. याच कारणामुळे त्याने जिजाबाई खैरणार यांच्या समवेत रात्री उशिरा वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्याने बाटलीतील ज्वलनशील पदार्थ आईच्या अंगावर ओतला. यानंतर त्याने तिला पेटवून दिले. जीवाच्या आकांताने जिजाबाई यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे जवळचे नागरिक मदतीसाठी धावले. मात्र प्रदीप याने त्यांच्या अंगावर देखील ज्वलनशील पदार्थ फेकून त्यांना पेटवून देण्याची धमकी दिली.

त्यामुळे नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन केला. यादरम्यान गंभीर भाजलेल्या जिजाबाई खैरनार यांना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा त्यात मृत्यू झाला. दरम्यान आपल्या आईला पेटवणाऱ्या प्रदीप या हा देखील या घटनेत किरकोळ भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे .दरम्यान या संदर्भात आता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात शिरपूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने केवळ पत्नीच्या समोर आई-वडील बोलतात, या किरकोळ कारणावरून दगड डोक्यात घालून आई आणि वडिलांची हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता धुळे तालुक्यात असाच प्रकार घडला आहे .त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT