लग्नाचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या बनावट नवरीसह टोळी गजाआड pudhari photo
धुळे

Dhule Crime | लग्नाचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या बनावट नवरीसह टोळी गजाआड

धुळे पोलीसांची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

धुळे | लग्नाचे नाटक करून धुळ्यातील तरुणाला तीन लाखाचा गंडा घालणाऱ्या बनावट नवरी आणि तिच्या बनावट नातेवाईकांना गजाआड करण्यात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन असणाऱ्या बनावट नवरीसह तिच्या तिघा नातेवाईकांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी देखील पथक रवाना करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात अविवाहीत तरूणांची संख्या मोठी असून लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होवुन बसले आहे. याच संधीचा गैरफायदा उचलत तरूणांना लग्नाचे अमिष दाखवत लग्नाचा बनाव करून पैसे उकळले जातात. समाजात बदनामी होईल, म्हणून फसवणूक झालेला परिवार तक्रार करीत नाहीत. हा महाराष्ट्रातील एक ज्वलंत विषय बनला आहे. धुळे शहरातील एका अविवाहीत तरूणाला अशाच प्रकारे लग्नाचा बनाव करून त्याच्या कडुन तीन लाख रूपये उकळणा-या टोळीला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील पथकाने पर जिल्हयात तसेच परराज्यात पाठलाग करून ही आंतरराज्यीय टोळीस गजाआड केले आहे.

बनावट नवरीचे नातेवाईकही बनावट 

धुळे येथील चाळीसगाव रोड परिसरात राहणारे ज्ञानेश्वर रोहीदास चौधरी हे त्याच्या लग्नाकरीता मुलीच्या शोधात असतांना एजंट मोरे यांनी बनावट नवरी मुलीचा फोटो चौधरी यांच्या मोबाईल वर पाठविला. सदर मुलगी पसंत आल्याने दिनांक 20/08/2024 रोजी फिर्यादी व त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल, मध्यप्रदेश येथे गेले. तेथे त्यांना फोटो मधली बनावट नवरी मुलगी दाखविण्यात आली. यावेळी नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते. त्यानंतर दिनांक 22/08/2004 रोजी एजेंट मोरे हा फिर्यादीचे घरी गेला. सदर मुलीला दुसरे स्थळ आले असुन तुम्हाला या मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब तीन लाख रूपये द्या, अशी मागणी केली त्यानुसार चौधरी यांच्या वडिलांनी लग्नासाठी 3 लाख रूपये गोळा करून दिले. त्यानंतर दिनांक 23/08/2024 रोजी फिर्यादी चौधरी व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल, येथे गेले. तेथुन बिजासनी माता मंदिर येथे हिंदु रिती रिवाजा नुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले.

अन् बनावट नवरी झाली फरार...

लग्न करून व-हाड बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांचेसह घरी परत येत असतांना धुळे तालुक्यातील सोनगीर येथे हॉटेल स्वागत मध्ये जेवनासाठी थांबले. याच संधीचा फायदा घेवून बनावट नवरी व तिची आई हे बाथरूमला जाण्याचा बनाव करून हॉटेलच्या बाहेर गेल्या व अज्ञात इसमाचे मोटार सायकलवर बसून पळून गेल्या. या संदर्भात फसवणूक झाल्याने चौधरी यांनी धुळे येथील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यानुसार भारतीय न्याय सहिता 2023 कलम 318(4), 319(2), 61(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट नवरीसह संशयित गजाआड

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याची सर्व माहिती घेतली. तसेच या गुन्ह्यात अन्य जिल्ह्यातील तसेच दुसऱ्या राज्यातील आरोपी देखील सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना आरोपींना गजाआड करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश केले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी एक पथक गठीत करून तपासाला चालना दिली.

सपोनि बोरसे यांनी दोन तपास पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. आरोपी हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यात लपण्याचे ठिकाण बदलत फिरत असल्याचे तपासात समोर आल्याने पोलीस पथक त्यांच्या मागावर होते. तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून पोलीस पथकाने आरोपीताचा शोध घेवून संशयित आरोपी सुनिल पदमसिंग चव्हाण, रा. दुधखेडा, ता. शहादा, (बनावट नवरी मुलीचा भाऊ), नसीम मुजफ्फर खान पठाण, रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा (एजंट) ,भागाबाई बळीराम गवळी, रा. रायसिंगपुरा नंदुरबार, (बनावट नवरी मुलीचा आई), नादरसिंग उर्फ महाराज भंटूसिंग रावत (पावरा), ( बनावट नवरी मुलीचा मामा) यांना अटक करण्यात यश आले. एक विधीसंघर्षीत बालिका (बनावट नवरी मुलगी) हीस ताब्यात घेवून रिमांड होम येथे जमा करून इतर आरोपींकडून अपहारीत रक्कम व एक मोटार सायकल जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता यात आणखी नावे पुढे आली आहेत.

साईबाई बाद-या पावरा, रा. मानमोडया, ता. शहादा (बनावट आजी), संजय रामा भिल, रा. दुधखेडा, ता. शहादा (बनावट नातेवाईक), जलनसिग प्रेमसिंग मोरे, रा.नांदया, ता. शहादा, (एजंट) यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून आता पोलीस पथक या आरोपींच्या मागावर आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT