सोनगीर : कापडणे गावातील कामगार नगर येथील रहिवासी असलेल्या ड्रायफ्रुट व्यापारी वासुदेव दयाराम माळी (वय २८) यांची भर दिवसा सकाळी ८:५५ वाजेच्या सुमारास धूम स्टाईल मध्ये चोरट्यांनी लूट करत १ लाख २० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना रामी गावाजवळ घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २०/०५/२०२६ रोजी वासुदेव माळी यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला रामी येथील रहिवासी असल्याचे सांगून एका दुकानदारांकडून तुमचा नंबर मिळवला आम्हाला तुमच्याकडून काही माल घ्यायचा असल्याची चर्चा केली. वासुदेव माळी यांनी अशा प्रकारे फोनवर ऑर्डर घेत नसल्याचे त्या इसमाला सांगितले असता त्याने रामी येथे या मग चर्चा करू असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी दिनांक २१/०५/२०२६ रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास वासुदेव माळी आपल्या मालकीची ओमनी गाडी क्रमांक MH १८ R ०१७५ ने नेहमी प्रमाणे दुकानदारांना आपल्या जवळील ड्रायफ्रुट विक्री करण्यासाठी निघाले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या घराशेजारील राहणारा गौरव रवींद्र पाटील होता. सकाळी ०८:५५ वाजेच्या सुमारास ते बुरझड गावाजवळ पोहोचले असता त्यांना परत त्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि त्याने रामी येथे येत आहात का असा प्रश्न केला. वासुदेव माळी यांनी होकार देत आपण रामी गावाजवळ पोहचत असल्याचे सांगितले.
त्यावेळेस दोन विनक्रमांकाची मोटारसायकल वर चार इसम तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांनी मोटारसायकल ओमानीच्या पुढे उभी केली. वासुदेव माळी आपल्या ओमानीतून काय झाले विचारण्यास उतरले असता त्या इसमांनी त्यांच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारला. त्यांच्या चेहऱ्यावर जळजळ होऊ लागली असता त्यांनी काही अंतरावर पळ काढला. त्या चार इसमानपैली तीन इसमांनी वासुदेव माळी यांचा पाठलाग केला व लोखंडी रॉड ने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आणि ते खाली पडले. नंतर ते इसम ओमनी जवळ गेले गाडीत बसलेल्या गौरव यास पकडून ठेवले आणि माळी यांनी व्यापारासाठी आणलेले १ लाख २० हजार रुपये गाडीतून काढून घटना स्थळावरून पळ काढला.
सदर घटनेबाबत चार इसमानविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम ३०९ , ११८ (१) अंतर्गत सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सोनगीर पोलिस करीत आहेत