Court News file photo
धुळे

Dhule Crime : हुंड्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या पतीसह चौघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

धुळे : हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी अंगावर रॉकेल टाकून व पेटवून सुनेचा खून केल्याप्रकरणी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा धुळे सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायमूर्ती एस. जे. गायकवाड यांनी ठोठावली आहे.

आरोपींमध्ये मृताचा पती सागर सूर्यवंशी, सासू सुमित्राबाई सूर्यवंशी, नणंद मालती पाटील आणि नंदोई छबुलाल पाटील यांचा समावेश आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील नावरा गावात रूपाली सागर सूर्यवंशी ही सुमारे २ वर्षांपासून ते ५ जुलै २०१४ दरम्यान सासरी नांदत असताना तिचा पती सागर सुभाष सूर्यवंशी, सासू सुमित्राबाई सुभाष सूर्यवंशी, दीर खगोल सुभाष सूर्यवंशी, नणंद मालती छबीलाल पाटील व नंदोई छबीलाल विश्राम पाटील यांच्याकडून तिचा छळ सुरू होता. या सर्वांनी संगनमत करून, "रूपालीच्या माहेरच्यांनी लग्नात हुंडा कमी दिला" असे कारण पुढे करत प्लॉट खरेदीसाठी ३ लाख रुपये आणि जावई सागर याच्या ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. या कारणावरून रूपालीचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्यातूनच ५ जुलै २०१४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सासरच्या मंडळींनी रूपालीचा खून घडवून आणला, अशी तक्रार दाखल झाली होती.

या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, ४९८ (अ), १२० (ब), ३२३, ५०४, ५०६ सह हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक यशवंत एस. साबळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायमूर्ती एस. जे. गायकवाड यांच्या न्यायालयात झाली. यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजय शंकरराव सानप यांनी सरकार पक्षातर्फे महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यात पंच साक्षीदार, घटनास्थळ पंच, वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर), तपासी अंमलदार आणि मृताची मुलगी यांचा समावेश होता. न्यायालयात डॉक्टर व मृताच्या मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजय सानप यांनी साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करत युक्तिवाद केला.

न्यायालयाने सर्व बाजूंचा सांगोपांग विचार करून आरोपींना भा.दं.वि. कलम ३०२, ४९८ (अ), १२० (ब), ३२३, ५०४, ५०६ सह हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ४ अन्वये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि सर्व आरोपींना मिळून १ लाख ३४ हजार रुपयांचा दंड सुनावला.

सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे अजय शंकरराव सानप यांनी बाजू मांडली, तसेच त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तंवर यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT