धुळे : गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमाभागात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून सुमारे 15 लाख 60 हजार रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून एकूण 6 घरफोडी गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी धुळे, मध्य प्रदेश व गुजरातमधील विविध ठिकाणांवरील तब्बल 375 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींची यापूर्वी कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हेगारी नोंद नव्हती, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4 लाख 78 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर घरफोडी करणाऱ्या टोळीने ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला. कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे, अकलाड या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांत घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. सर्व प्रकरणांची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.
घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पथकासह घटनास्थळांना भेटी दिल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. मात्र आरोपी कोणताही ठोस पुरावा मागे न ठेवता राज्याबाहेर पसार होत असल्याने पोलिसांपुढे हा तपास मोठा आव्हान ठरले. तपासादरम्यान लेखनिक नितीन चव्हाण, उमेश पवार, पोना कुणाल शिंगाणे, पोना राजू पावरा यांनी पारंपरिक तपासपद्धतीचा वापर करत साक्षीदारांची चौकशी, जुन्या गुन्हेगारांची माहिती व गुप्त बातमीदारांकडून माहिती संकलित केली. त्याचबरोबर पोना गजेंद्र मुंडे, राहुल देवरे व प्रतिक देसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.
सतत 17 दिवस तपास सुरू ठेवत मिळालेल्या धाग्यांच्या आधारे पथकाने सलग 5 दिवस प्रवास करून गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील दाहोद व गोधरा जिल्ह्यात छापा टाकला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली देत धुळे येथील स्थानिक साथीदाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व आरोपींना धुळे येथे आणून अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तपासादरम्यान स्थानिक साथीदारालाही अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपींनी एकूण 6 घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून 120 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मुद्देमाल जप्त करणे तसेच इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.