धुळे

धुळे दुहेरी हत्याकांड: 'ती' क्रूरता अन दिवसाढवळ्या झालेला खून; आरोपींची दयेसाठी याचना, तर सरकार पक्षाची फाशीची मागणी

या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल उद्या गुरुवार १२ मार्च रोजी जाहीर होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

धुळे: संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या गोंदूर रोडवरील पिता-पुत्राच्या निर्घृण हत्याकांडाचा पेच आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या १२ आरोपींनी न्यायालयात वयाचे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे कारण देत दयेची याचना केली आहे. मात्र, "हे हत्याकांड 'दुर्मिळातील दुर्मिळ' (Rarest of Rare) असून आरोपींना फाशी किंवा दुहेरी जन्मठेपच द्यावी," असा आक्रमक युक्तिवाद सरकारी पक्षाने केला आहे. या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल उद्या, गुरुवार १२ मार्च रोजी जाहीर होणार आहे.

आरोपींचा दयेचा युक्तिवाद

सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्यासमोर आज झालेल्या सुनावणीत सर्व आरोपींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह अन्य आरोपींनी भावनिक साद घालत न्यायालयाला सहानुभूती दाखवण्याची विनंती केली. आरोपी बाजीराव पवार यांनी "माझे वय ७६ वर्षे असून मला अनेक व्याधींनी ग्रासले आहे," असे म्हणत त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे केले. इतर अनेक आरोपींनी घरातील आई-वडील वृद्ध आणि आजारी असल्याचे सांगितले, तर काहींनी कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्यावरच असल्याचे सांगत शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली.

'समाजात वचक हवा' ; सरकारी पक्षाची भूमिका

जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी आरोपींच्या मागणीला कडाडून विरोध केला. त्यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले की, "हे हत्याकांड केवळ खून नसून अत्यंत क्रूरपणे केलेली मानवी हत्या आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी आरोपींना कठोर शासन होणे गरजेचे आहे." सरकारी पक्षाने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता फाशीची किंवा किमान दुहेरी जन्मठेपेची मागणी केली आहे.

न्यायालयात गर्दी आणि तणाव

या खटल्याचे गांभीर्य पाहता आज न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती हाताळताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. वकील आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे न्यायालयाचा हॉल तुडुंब भरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT