धुळे : धुळे जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल थेट मुख्य न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा ई-मेल प्राप्त झाल्याचे निदर्शनास येतात मुख्य न्यायाधीश श्रीमती भीष्मा यांनी तातडीने सर्व न्यायालय रिकामे करण्याचे आदेश दिले. तसेच ही माहिती जिल्हा पोलीस दलाला देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
धुळे जिल्हा न्यायालयात सर्व न्यायालयांमध्ये नियमित सुनावणीचे काम सुरू असताना न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा देणारा ईमेल थेट मुख्य न्यायाधीश यांच्या ई-मेलवर आला .या ई-मेलमधून बॉम्बस्फोट करण्याचा इशारा देण्यात आला होता. या गंभीर प्रकारानंतर न्यायालय प्रशासनाने तातडीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याने न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली.
न्यायालय प्रशासनाने त्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दिल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच शहर पोलीस ठाण्याची निरीक्षक अर्चना पाटील यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा बॉम्बशोधक पथकासह न्यायालयात दाखल झाला.
त्यावेळी न्यायालयाच्या विविध दालनांमध्ये नियमित कामकाज सुरू होते. काही ठिकाणी महत्त्वपूर्ण सुनावण्या, तर काही न्यायालयांमध्ये चॅप्टर केसेस सुरू होत्या. मात्र, अचानक इमारत रिकामी करण्याचे निर्देश मिळताच न्यायालयीन कामकाज थांबवण्यात आले. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झाली. ही सर्व गर्दी न्यायालयाच्या बाहेर आल्यामुळे रहदारी देखील बाधित झाली.
बॉम्बशोधक पथकाने न्यायालयाच्या प्रत्येक मजल्याची, दालनांची आणि परिसराची बॉम्ब डिटेक्टरच्या साहाय्याने कसून तपासणी सुरू केली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.