धुळे जिल्हा काँग्रेसने आक्रमक आंदोलन करत केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारचा निषेध केला. Pudhari
धुळे

Dhule Congress Protest | पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक; भाजप सरकारचा निषेध

काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

Fuel Price Hike Agitation

धुळे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात धुळे जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी आक्रमक आंदोलन करत केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारचा निषेध केला. काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला असून, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे घोडागाडीत रिकामे गॅस सिलेंडर आणि पेट्रोलसाठी वापरले जाणारे १५ लिटरचे रिकामे बॅरल ठेवून दरवाढीविरोधात प्रतीकात्मक निषेध नोंदविण्यात आला. या अनोख्या आंदोलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. मोर्चादरम्यान युवराज करनकाळ स्वतः घोडागाडीवर स्वार झाले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले.

करनकाळ म्हणाले की, गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांवर ही दरवाढ अन्यायकारक आहे. गेल्या बारा वर्षांत पेट्रोलच्या दरात सुमारे २८ टक्के, तर डिझेलच्या किमतीत ६२ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. पेट्रोलियम पदार्थांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून महागाईत भर पडत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांनाही शेतीकाम करताना अडचणी निर्माण होत असून, याचा शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढ तातडीने मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, तसेच इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

या आंदोलनात रमेश श्रीखंडे, अॅड. सुधीर जाधव, गुलाबराव कोतेकर, गायत्री जयस्वाल, पितांबर महाले, शहराध्यक्ष साबीर शेख, भा. ई. नगराळे, आलोक रघुवंशी, प्रमोद शिसोदे, बानूताई शिरसाठ, राजेंद्र खैरनार, भूषण अहिरे, कन्हैया अहिरे, शालिग्राम गर्दे, प्रशांत अहिरे, मुजफ्फर हुसेन, नागराज चौधरी, दीपक पाटील, कृष्णा ठाकूर, आबा मुंडे, चंद्रकांत शिरसाठ, फारुख शेख, विजय करनकाळ, विजय चौधरी, किशोर वाकळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT