दरवाढीविरोधात धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले  Pudhari
धुळे

Dhule Congress Protest | धुळ्यात साखर वाटून काँग्रेसचा भाजप सरकारच्या ‘अच्छे दिन’वर उपरोधिक निषेध

महागाई, इथेनॉल भेसळ व साखरेच्या आयातीवरून निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

Sugar Import Ban Protest

धुळे : वाढती महागाई, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे धोरण तसेच सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीविरोधात धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शिवतीर्थ परिसरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागरिक, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांना साखर वाटून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

“स्वतःच्या पैशाने तोंड गोड करणे आता सर्वसामान्यांना अवघड झाले आहे, म्हणून काँग्रेसतर्फे नागरिकांचे तोंड गोड केले जात आहे,” असा उपरोधिक टोला यावेळी लगावण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा निवृत्त आयएएस अधिकारी भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, धुळे शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुधीर जाधवपितांबर महालेमुझफ्फर हुसेन, साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डेराजेंद्र खैरनाररवींद्र सोनावणे, माजी नगरसेवक अमीन पटेलअबोलास शेख, उपाध्यक्ष किशोर वाकळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पूर्वी ३५ ते ४० रुपये किलो असलेली साखर आता ७० ते ८० रुपयांवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला. आगामी सणासुदीत दर आणखी वाढण्याची शक्यता असून, साखरेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, पेट्रोलमध्ये ई-२० इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा करत पेट्रोलचे दर कमी करण्याऐवजी वाढवले जात असल्याची टीकाही काँग्रेस नेत्यांनी केली.

देशांतर्गत साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर ब्राझीलमधून कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांपेक्षा ठराविक उद्योगपतींना फायदा मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT