धुळे

धुळे : चाचा नेहरु बाल महोत्सवाचे सीईओ गुप्ता यांच्या हस्ते उद्धाटन

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शिक्षकांनी मुला-मुलींमध्ये बालविवाहामुळे होणा-या दुष्परिणामाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी शुभम गुप्ता यांनी केले.

महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी तसेच संस्थेबाहेरील मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्धाटन आज जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महिला बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, अपर कोषागार अधिकारी पंकज देवरे, तालुका क्रीडा अधिकारी रेखा पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, परीविक्षा अधिकारी दिनेश लाडगे, पी.एम.कोकणी, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले की, प्रशासनामार्फत बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती केली जात असुन जिल्ह्यात बालविवाह रोखायचा असेल तर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बालविवाहामुळे होणा-या दुष्परिणामांची जनजागृती करावी. तसेच प्रत्येक मुलींनी आपल्या पालकांना सुद्धा सांगणे गरजेचे आहे की, जो पर्यंत मी 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. त्याचप्रमाणे मुलांनी सुद्धा 21 वर्ष वय झाल्यावरच लग्न करणार असल्याचे आपल्या पालकांना सांगावे. तसेच आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याचे आढळुन आल्यास त्वरीत 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमात सहभागी होऊन आपला जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, बालविवाह कोणकोणत्या कारणांमुळे होतात या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत ज्या 47 गावांमध्ये अधिक बालविवाह होतात त्याठिकाणी एक विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी युनिसेफच्या मदतीने 50 चॅम्पियनची नियुक्ती केली आहे. आणि त्या प्रत्येक चॅम्पियनची एका गावात नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत बालविवाह थांबविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळेत बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासनामार्फत एक ॲप तयार करुन त्यामार्फत प्रत्येक पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करुन प्रत्येक महिन्याला त्यांची हजेरी घेवून विद्यार्थींनीच्या गळतीची खात्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय उपायुक्त पगारे म्हणाले की, संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नाशिक विभागातील पहिला बाल महोत्सव हा धुळ्यात संपन्न होत आहे. हा महोत्सव 3 ते 5 जानेवारी, 2024 दरम्यान आयोजित केला आहे. या बाल महोत्सवात विविध क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी नाशिक विभागीय महोत्सवासाठी खुप कमी स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हय़ाच्या बाल महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना विभागीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाव असून या महोत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व घडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी लेखाधिकारी मनिषा पिंपळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी केले. तर सुत्रसंचलन अर्चना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गिरीष जाधव यांनी केले.

प्रारंभी गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने निरीक्षणगृह, बालगृहातील विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT