धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील दभाषीजवळ एस. टी. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक महिला प्रवासी ठार, तर २२ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
शिरपूरहून शिंदखेडा कडे निघालेली शिंदखेडा आगाराची बस महामार्गावरील दभाषी परिसरात आली असता ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत बसचे मोठे नुकसान झाले असून, धडकेमुळे बसचा पत्रा फाटला. अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट उडाली आणि त्यानंतर प्रवाशांनी आक्रोश केला. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक व इतर वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा आगाराचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.