Bribe Case Pudhari
धुळे

Dhule Bribe Case : धुळ्यात ACBचा धडाका; ज्वारीचा उच्च दर्जा दाखवण्यासाठी ५ हजारांची लाच घेणा-या पुरवठा निरीक्षकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शासनाच्या किमान आधारभूत भरडधान्य खरेदी केंद्रावर ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष महेश बागुल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या धडक कारवाईमुळे महसूल व पुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे धुळे तालुक्यातील मौजे अंचाडे येथील रहिवासी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या शेतजमिनीत पिकवलेली ज्वारी महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत भरडधान्य खरेदी हंगाम (रब्बी सन २०२५-२६) अंतर्गत शासनाला विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार, ज्वारीचा माल विक्रीसाठी ते धुळे येथील शासकीय गोदामात घेऊन गेले होते. तेथे ज्वारीच्या मालाची मोजणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांना मोजमापाच्या पावत्या दिल्या.

त्यानंतर तेथे हजर असलेले तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल यांनी तक्रारदाराला बाजूला नेले आणि "तुमच्या ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून मोजणी करून दिली आहे, त्याचे मला ५ हजार रुपये द्यावे लागतील; अन्यथा तुमचे ऑनलाईन बिल मंजुरीसाठी पुढे पाठवणार नाही," अशी धमकीवजा अट घालत लाचेची मागणी केली. शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, पुरवठा निरीक्षक मनीष बागुल यांनी तक्रारदाराची ज्वारी चांगल्या दर्जाची दाखवण्याच्या मोबदल्यात पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल तसेच पोलीस अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैदाणे, सागर माळी आणि सुधीर मोरे यांच्या पथकाने शासकीय गोदामात सापळा रचला. तक्रारदार शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची रोकड स्वीकारत असतानाच मनीष बागुल यांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT