धुळे

Dhule Bribe Case : विहिरीचे अनुदान मिळवण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या साक्री पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकास रंगेहात अटक

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शासकीय योजनेतील विहिरीचे अनुदान मिळवण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या साक्री पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक नितीन नारायण वारकर यांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील तक्रारदार यांचा भाऊ यांस महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रिय रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२३ २४ मध्ये विहिर खोदण्यासाठी ४ लाख रुपये मंजुर झाले होते. विहिरीचे काम सुरु करण्यासाठी साक्री येथिल गटविकास अधिकारी यांनी दि.८ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. त्याप्रमाणे तक्रारदार यांच्या भावाने विहिरीचे काम सुरु केले. विहिरीच्या झालेल्या कामाप्रमाणे त्यांना अनुदानाचे एकुण पंधरा हप्ते मिळाले. त्यानंतर उर्वरीत अनुदान मिळण्याकामी तांत्रिक सहायक नितीन वारकर यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२६ रोजी विहिरीचे मोजमाप करुन झालेल्या कामाच्या १ लाख ६२ हजार ३२० रुपये मुल्यांकनाची मोजमाप पुस्तिकेमध्ये नोंद केली होती.

हे अनुदान मिळण्याकरीता तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालयात जावुन तांत्रिक सहायक नितीन वारकर यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी मोजमाप पुस्तिका तपासणी करीता शाखा अभियंता यांच्याकडे पाठविण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांची भेट घेऊन त्यांना तक्रार केली.

या तक्रारीची आज रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तांत्रिक सहायक नितीन वारकर यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल,तसेच पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, पोकॉ. जगदीश बडगुजर यांनी सापळा लावला.

सापळा कारवाई दरम्यान तांत्रिक सहायक नितीन वारकर यांनी तक्रारदार यांच्याकडुन १० हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT